पुणे, दि. १४ जुलै २०२२: सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात गेल्या पाच दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये महावितरणच्या पुणे परिमंडलातील सुमारे ४ हजार २७५ महिला व पुरुष अभियंते, कर्मचारी तसेच दुरुस्ती कामांसाठी नेमण्यात आलेले कंत्राटादार व कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध धोके पत्करून व सुरक्षेची काळजी घेत अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. तथापि, सातत्याने सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणामुळे तसेच मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या विविध कामांमुळे या धो-धो पावसातही पुर्वीच्या तुलनेत उच्चदाब वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण कमी झाले आहे हे विशेष.

दरम्यान मुसळधार पाऊस व अन्य संबंधित कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी असावा व त्यासाठी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे कामे देखील लवकरात लवकर करण्यात यावे असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी (दि. १३) बुधवारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंडलनिहाय शाखा अभियंत्यांपर्यंत घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.
पावसात वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे– प्रामुख्याने पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये विविध संस्थांकडून झालेल्या खोदकामात काही उच्च व लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांना क्षती पोहोचल्याचे परिणाम आता पावसाळ्यात दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या रस्ता रुंदीकरणात किंवा क्रॉन्क्रिटीकरणामध्ये रस्त्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच रस्त्याची उंची वाढवल्यामुळे कडेला असलेले फिडर पीलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. यासोबतच वीज यंत्रणेवर किंवा सर्व्हीस वायरवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, आदींमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. तर शहर व ग्रामीणमधील काही खोलगट व सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करून ठेवण्यात येत आहे.
भर पावसातही अविश्रांत दुरुस्ती काम- वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीजपुरवठा कधी पूर्ववत होईल याची ग्राहकांना प्रतीक्षा असते. मात्र अत्यंत खडतर परिस्थितीत रात्री देखील सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या महावितरणच्या प्रकाशदूतांची कामगिरीची माहिती नसते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सर्वप्रथम प्राथमिक चाचणी घेतली जाते. त्यामधून वीज सुरळीत झाली नाही तर पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु केला जात आहे. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्यास दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जॉईंट देणे आदी कामे करावी लागत आहेत. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाण्याचा उपसा करून ही कामे करावी लागत आहेत. मात्र भूमिगत वीजवाहिनी कॉन्क्रीट रस्त्याखाली किंवा रस्त्याची उंची वाढल्याने खूप खोल असल्यास वेगळी वीजवाहिनी टाकून वीजपुरवठा सुरु करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.तसेच उपरी वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्यास ती बाजूला करणे, वीजतार नवीन टाकणे, पीन किंवा डिस्क इन्सूलेटर बदलणे आदी कामे करण्यात येत आहेत. ही कामे करताना कधी अत्यंत अडचणीच्या ठिकाणी किंवा साचलेल्या किंवा प्रवाह सुरु असलेल्या पावसाच्या पाण्यात उतरून अभियंते व जनमित्र करीत आहेत. दुरुस्ती कामांमध्ये महिला अभियंता व कर्मचारी देखील भर पावसात कर्तव्य बजावत आहेत.
सध्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेवर झाडे व फांद्या पडणे, पाणी साचणे आदी विविध प्रकारांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. मात्र महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रतिकूल परिस्थितीत ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
नाल्याच्या पात्रात जाऊन तीन ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत
लोणावळामध्ये आयटीआय कॉलेजच्या मागे असलेल्या कालव्यालगत उपरी वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे तीन उच्चदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होता. परंतु महावितरणचे जनमित्र दिनेश मिस्त्री व नितीन पितले यांनी कंबरेभर पाण्यातून सुमारे ६०० मीटर वाट काढत पाण्याच्या प्रवाहात असलेल्या वीजखांबावर चढून दुरुस्ती काम केले व अवघ्या दीड तासात या तिनही ग्राहकांचा वीजपुवरठा पूर्ववत केला.

