अण्णा हजारे यांच्याशी राळेगण सिद्धीत दीर्घ चर्चा
पुणे/राळेगणसिद्धी : येत्या 30 जून राज्यात सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत ग्रामरक्षक दल स्थापन केल्या जातील तर 15 जूनपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात ग्रामरक्षक दल तयार करून या जिल्ह्यातील दलाच्या अध्यक्षांची एक बैठक घेऊन त्यांना आपल्या अधिकारांची माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्गशेखर बावनकुळे यांनी केले.
राळेगण सिद्धी येथे प्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक यांचेशी चर्चा करताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे बोलत होते. अण्णा हजारे यांच्याशी उत्पादन शुल्क विभागा संदर्भातील प्रश्नांवर दीर्घकाळ बावनकुळे यांनी चर्चा केली. याप्रसंगी आ. विजय औटी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानूदास बेरड, राळेगण सिद्धीच्या सरपंच रोहिणी हजारे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामरक्षक दल, अवैध दारूबंदी यावर शासनाने केलेली कारवाई अण्णांना सांगण्यात आली. सन 2016-17 मध्ये 23 हजार आरोपींकडून 8 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नियंत्रण कक्ष स्थापन झाले. टोल फ्री नंबर सुरु झाले. पोलिस व उत्पादन शुल्क विभाग मिळून प्रतिबंधक कारवाई सुरु केल्याची माहिती बावनकुळे यांनी अण्णा हजारे यांना दिली.
उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात न्यायालयात लढणार्या प्रकरणांसाठी विभागाजवळ चांगले वकील नव्हते. वकिलांची 44 नवीन पदे निर्माण करण्यात आली, असे सांगताना उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे म्हणाले. परवान्यावर मिळणार्या दारुच्या बाटल्या आता 12 वरून 2 वर आणण्यात आल्या आहेत. याशिवाय ताडीचे धोरण राज्यात नव्हते. शासनाने ताडीचे धोरण आणले. 30 जिल्ह्यात ताडी दुकाने नव्हती पण तेथे ताडी मिळत होती. ताडी धोरणात 1000 झाडांना एक दुकान असे धोरण आणले. 24 जिल्ह्यातील ताडी दुकाने बंद झाली. ताडीमुळे होणारे मानवाचे नुकसान लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. तसेच चांगले काम करणार्या अधिकारी व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही बावनकुळे म्हणाले.
अवैध दारू निर्माण करणारे राज्यात 1900 सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवून एमपीडीएची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, पांगरमल अवैध दारू निर्मिती प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश आले असून, 14 मुद्द्यांवर या प्रकरणाशी तपासणी होणार असून आरोपींवर मकोका व एपीडीएची कारवाई करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी अण्णा हजारेंना सांगितले. धुळे, नंदुरबार येथील अवैध दारू निर्मिती करणारा दादा वाणी याला अटक करण्यात आली आहे. 10 वर्षात या वाणीला आतापर्यंत कुणी अटक केली नव्हती. याशिवाय 1903 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तडीपारीची प्रकरणे महसूल विभागाकडून पोलिसांकडे द्यावीत, अशी सूचनाही अण्णा हजारे यांनी यावेळी केली. अण्णा हजारे यांनी शासनाला ज्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केल्या होत्या, त्या सर्व सूचनांची दखल घेऊन त्यावर घेतलेल्या निर्णयांची माहिती उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी अण्णांना यावेळी दिली.
– बावनकुळे यांच्या कार्याचे अण्णांकडून कौतुक
जनतेचे काम जनतेच्या गावात जाऊन त्यांना अर्पण करणारा मंत्री, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्गशेखर बावनकुळे यांच्या कार्याचे कौतुक केले.
अवैध दारूबाबत जी प्रकरणे प्रलंबित होती ती मंत्र्यांनी आज येथे येऊन सोडवून दिली असे सांगताना अण्णा हजारे म्हणाले, बावनकुळेंप्रमाणे सर्व मंत्र्यांनी शासन आपल्या दारी उपक्रम राबवले तर महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य ठरेल. एक किमीच्या जागेवर सोलर पॅनल उभे करून शेतकर्यांसाठी राबवण्यात येणारा पहिला प्रकल्प राळेगण सिद्धीत घेत आहोत हे सांगण्यासाठी ते येथे आले, हा त्यांचा मोठेपणा असल्याची पावती आज अण्णांनी बावनकुळे यांना दिली.