पुणे, : महावितरणच्या वीजबिलाची रक्कम ‘ऑनलाईन’ भरण्यात पुणे परिमंडल राज्यात प्रथम क्रमांकावर असून गेल्या आर्थिक वर्षात पुणे परिमंडलात तब्बल 860 कोटी 57 लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. सन 2014-15 या वर्षांच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात 336 कोटी वाढ झाली असून ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान, पुणे परिमंडलातील 5 लाख 3 हजार 268 वीजग्राहकांनी गेल्या एप्रिल महिन्यात आजवरचा विक्रमी 86 कोटी 80 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबील भरणा केला आहे.
पुणे परिमंडलात सन 2014-15 मध्ये एकूण 524 कोटी 53 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला होता व सरासरी दरमहा 43 कोटी 75 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ भरणा झाल होता. या तुलनेत सन 2015-16 मध्ये एकूण 860 कोटी 57 लाखांचा भरणा झाला आहे. वर्षभरातच ‘ऑनलाईन’ वीजबील भरणात तब्बल 336 कोटींनी वाढ झाली असून दरमहा सरासरी तब्बल 72 कोटींवर गेली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात गणेशखिंड मंडलमधील ऑनलाईन पेमेंट करणार्या 2 लाख 39 हजार ग्राहकांनी 41 कोटी 13 लाखांच्या वीजबीलाचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे. यात सर्वाधिक पिंपरी विभागात 95 हजार 714 ग्राहकांनी 12 कोटी 71 लाख रुपयांचा भरणा केलेला आहे. पुणे परिमंडलात सर्वाधिक ऑनलाईन भरणा पिंपरी विभागात होत आहे. रास्तापेठ मंडलमधील 1 लाख 98 हजारांवर ग्राहकांनी 32 कोटी 71 लाखांच्या देयकांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे. यात सर्वाधिक बंडगार्डन विभागात सर्वाधिक 44 हजार 860 वीजग्राहकांनी 8 कोटी 74 लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर पुणे ग्रामीण मंडलातील 65 हजार 637 ग्राहकांनी 12 कोटी 96 लाखांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे.
महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरणासह इमेलद्वारे वीजबिलाची सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या इमेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तसेच छापील कागदासह इमेलद्वारेही वीजबील मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजबिलाचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी क्रेडीट, डेबीट किंवा नेटबॅकींगचा पर्याय उपलब्ध असून वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह देयक ‘ऑनलाईन’ भरणाची सोय उपलब्ध आहे. मुदतीनंतर भरलेल्या देयकाची पावती महावितरणच्या संबंधीत कार्यालयात दाखविणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येईल.

