वीजग्राहकांची संख्याही साडेआठ लाखांवर
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील 8 लाख 73 हजार वीजग्राहकांनी वीजदेयकांपोटी गेल्या डिसेंबर महिन्यात 135 कोटी 62 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजदेयकांच्या ‘ऑनलाईन’ भरण्याकडे वीजग्राहकांचा कल वाढत असल्याची स्थिती आहे.
महावितरणने इंटरनेटद्वारे www.mahadiscom.in या वेबसाईटवर ‘ऑनलाईन’ बील पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना चालू व मागील देयके पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अॅपवरून वीजदेयके भरणा करण्याकडे ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या डिसेंबर महिन्यात 6,58,830 वीजग्राहकांनी 106 कोटी रुपयांच्या वीजदेयकांचे ‘ऑनलाईन’ पेमेंट केले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 61,805 ग्राहकांनी 9 कोटी 36 लाख, सांगली जिल्ह्यात 33,522 ग्राहकांनी 6 कोटी 69 लाख, सातारा जिल्ह्यात 83,198 ग्राहकांनी 8 कोटी 40 लाख आणि सोलापूर जिल्ह्यातील 36,064 ग्राहकांनी 6 कोटी 14 लाख रुपयांच्या वीजदेयकांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे.
महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाईन’ बिल भरणासह इमेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या फक्त इमेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह इमेलद्वारेही वीजबील मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह देयक ‘ऑनलाईन’ भरण्याची सोय उपलब्ध आहे.