पुणे: पुणे परिमंडलात वीजदेयकांची सद्यस्थितीत असलेली थकबाकी शुन्यावर येईल या उद्दिष्टाने काम करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. यापुढे उत्कृष्ट ग्राहकसेवा तसेच थकीत व दरमहा वीजदेयकांच्या वसुलीनुसारच संबंधीत अधिकारी, कर्मचार्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.
महावितरणच्या ‘प्रकाशभवना’त पुणे परिमंडलमधील विविध कामांचा आढावा प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी घेतला. यावेळी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. अरूण थोरात, श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, श्री. सुनील पावडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. धैर्यशील गायकवाड उपस्थित होते.
प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले, वीजदेयकांची नियमित वसुली झाली नाही किंवा थकबाकी वाढली तर महावितरणला अनेक आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पुणे परिमंडलात वीजदेयकांची थकबाकी शून्य होईल अशा पद्धतीने काम करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. वीजदेयकांच्या वाढत्या थकबाकीबाबत यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली व वारंवार आवाहन करूनही थकीत वीजदेयके न भरणार्या ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश दिले.
‘नवप्रकाश’ योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रतिज्ञापत्राची किंवा दोन टक्के रक्कम भरण्याची आवश्यकता नाही असे प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी स्पष्ट केले. मूळ थकबाकीच्या रकमेचे www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले किंवा महावितरणच्या कार्यालयातून मिळालेले वीजबिल भरले की संबंधीत ग्राहकांना थकबाकीमुक्त होता येत असल्याचे त्यांनी सांगितले. थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या लघु व उच्च दाबाच्या वीजग्राहकांसाठी नवप्रकाश योजना सुरु आहे. व्याज व दंड माफ होणार असल्याने केवळ मूळ थकबाकीची रक्कम भरून थकबाकीमुक्त होण्याची व मोफत नवीन वीजजोडणी मिळविण्याची सुवर्णसंधी या योजनेतून प्राप्त झालेली आहे. त्याचा लाभ थकबाकीदारांनी घेतला पाहिजे. थकबाकीदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांना ‘नवप्रकाश’ योजनेचा लाभ देण्याच्या प्रयत्नांना आणखी वेग देण्यात यावा, अशी सूचना श्री. ताकसांडे यांनी यावेळी केली.
वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी झाल्यानंतर वीजबिलाचा तपशील, वीजपुरवठा बंद असल्याचा कालावधी किंवा देखभाल व दुरुस्तीच्या कालावधीची माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येणार आहे. पुणे परिमंडलात 26 लाख 22 हजार पैकी 11 लाख ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे झाली आहे. उर्वरित सर्वच वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी, असे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी सांगितले. या बैठकीला कार्यकारी अभियंता, उपविभाग कार्यालयांच्या प्रमुखांसह अधिकारी उपस्थित होते.