पुणे, दि. 23 : महावितरण कंपनीशी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नसताना काही व्यक्ती वीजग्राहकांकडे जाऊन विजेची उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह करीत असल्यास अशा व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण कोणत्याही वस्तुचे उत्पादन करीत नाही किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाचे किंवा उपकरणाचे प्रमोशन करीत नाही. केवळ एलईडी बल्ब विक्रीसाठी केंद्ग शासनाच्या एनर्जी एफिशियंसी सर्व्हीसेस लिमिटेट (ईईएसएल) या कंपनीला महावितरण सहकार्य करीत आहेत.
तथापि, काही व्यक्ती वीजग्राहकांकडे जाऊन विजेच्या बचतीचे किंवा सुरक्षेचे उपकरणे महावितरणकडून प्रमोट करण्यात येत असल्याचे दर्शवीत आहेत. तसेच ओळखपत्राची झेरॉक्स घेऊन ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात विजेची उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह करीत असल्याचे काही जागरुक वीजग्राहकांनी महावितरणला भ्रमणध्वनीद्वारे कळविले आहे. महावितरणशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध दर्शवून कोणत्याही कंपनीच्या वस्तू किंवा उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह करणार्या व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.


