दि. 30 नोव्हेंबरपर्यंत मूळ थकबाकीत 5 टक्के सूट
पुणे, : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या 5 लाख 70 हजार वीजग्राहकांना महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेतून थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध झाली आहे.
महावितरणच्या पुणे, कोल्हापूर व बारामती या परिमंडलात दि. 31 मार्च 2016 पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या 5 लाख 70 हजार उच्च व लघुदाब थकबाकीदारांसाठी ‘नवप्रकाश’ योजना सुरु आहे. या थकबाकीदारांकडे 472 कोटी रुपयांची मूळ थकबाकी, 98 कोटी 58 लाख रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी 4 कोटी 73 लाख रुपयांची थकबाकी आहे.
‘नवप्रकाश’ योजनेत येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये 5 टक्के सूट दिली जाईल तसेच व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. दि. 1 नोव्हेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच दि. 1 फेब्रुवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 पर्यंत मूळ थकबाकीसोबत 25 टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार असून उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.
मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सोय व संबंधीत ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम धनादेशद्वारेही रक्कम स्वीकारली जाणार आहे. ‘नवप्रकाश’ योजनेत सहभागी होण्यासाठी मूळ थकबाकीची 2 टक्के रक्कम भरण्याची अट रद्द करण्यात आली आहे. थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हीस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. तथापि, सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी नजिकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
लोकअदालतीमध्ये पुणे परिमंडलातील
393 वीजग्राहक थकबाकीमुक्त
पुणे, : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणच्या पुणे परिमंडलातील 393 वीजग्राहक तडजोडीतून थकबाकीमुक्त झाले आहे. या थकबाकीदारांशी झालेल्या तडजोडीतून 26 लाख 91 हजार रुपये देयकांपोटी मिळणार आहेत.
पुणे परिमंडलातील थकबाकीदारांची दाखलपूर्व प्रकरणे अंतीम निकालासाठी या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या थकबाकीदार 393 वीजग्राहकांना महावितरणच्या थकबाकीमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला व त्यांनी थकीत देयकांपोटी 26 लाख 91 हजार रुपये भरण्याचे मान्य केले. रास्तापेठ मंडलमधील 172 थकबाकीदार ग्राहकांनी 12 लाख 42 हजार, गणेशखिंड मंडलमधील 50 ग्राहकांनी 6 लाख 5 हजार तर पुणे ग्रामीण मंडलमधील 171 थकबाकीदारांनी 8 लाख 44 हजार रुपयांची थकबाकी भरण्याचे मान्य केले आहे. थकबाकीचा भरणा केल्यानंतर संबंधीत वीजग्राहकांना मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे.