पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. 12) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणच्या पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातील वीजग्राहकांना तडजोडीतून थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध झाली आहे.
पुणे जिल्हा व सत्र सेवा न्यायालयाच्या वतीने पुणे परिमंडलातील थकबाकीदार वीजग्राहकांना विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 25 (2) प्रमाणे नोटीस पाठविण्यात येत आहे. त्यात देयकांचा तपशील देण्यात आला असून पूर्वचर्चेने समेट करण्यासाठी थकबाकीदारांनी संबंधीत ठिकाणच्या लोकअदालतीमध्ये उपस्थित राहण्याचे नमूद करण्यात आले आहे. यात शिवाजीनगर (पुणे), पिंपरी, घोडेगाव, जुन्नर, खेड, वडगाव मावळ येथील न्यायालयात लोकअदालतीचे शनिवारी (दि. 12) सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या महावितरणच्या थकबाकीमुक्ती योजनेचा लाभ या लोकअदालतीमध्ये सहभागी झालेल्या वीजग्राहकांना देण्यात येणार आहे.
पुणे परिमंडलातील थकबाकीदारांची दाखलपूर्व प्रकरणे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 19(5)(2) अन्वये तातडीने अंतीम निकालासाठी ठेवण्यात येणार आहे. या सर्व थकबाकीदार ग्राहकांनी लोकअदालतीमध्ये उपस्थित राहावे तसेच थकीत देयकांबाबत माहिती किंवा त्याचा भरणा करण्यासाठी संबंधीत विभाग किंवा उपविभाग कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
या लोकअदालतीमध्ये तडजोड केल्यास थकबाकीदार वीजग्राहकांना पुढील कायदेशीर कारवाई टाळता येणार आहे. तसेच तडजोडीसाठी सध्या सुरु असलेल्या महावितरणच्या थकबाकीमुक्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यातील थकबाकीमुक्त वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येईल व त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हीस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येईल, अशी माहिती पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी दिली.