३२०० औद्योगिक ग्राहकांना मिळणार दर्जेदार वीजपुरवठा
पुणे, दि. १० फेब्रुवारी २०२३: चाकण एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी एमआयडीसी विद्युत सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेले तीन नवीन स्विचिंग स्टेशन, एका स्विचिंग स्टेशनची क्षमतावाढ तसेच इतर विविध कामांसह वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणाला महावितरणकडून सुरवात करण्यात आली आहे.
चाकण येथे शुक्रवारी (दि. १०) २२/२२ केव्ही किंग्फा स्विचिंग स्टेशन व इतर कामांचे भूमिपूजन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. दिलीप बटवाल व पदाधिकारी श्री. विनोद जैन व श्री. नीलेश राठी तसेच कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे व श्री. अमीत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, औद्योगिक ग्राहक महत्त्वाचे असून त्यांना तत्पर सेवा देण्यासह चोवीस तास सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणाचे कामे वेगाने होतील असा प्रयत्न आहे. तसेच महापारेषणच्या अतिउच्चदाब व महावितरणच्या उच्चदाब उपकेंद्रांमधील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतावाढीसह विविध कामे प्रस्तावित करण्यात येत असून त्याचाही आराखडा लवकरच तयार होईल. विद्युत सुधार योजनेअंतर्गत सुरु झालेल्या स्विचिंग स्टेशन व इतर कामे येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण करावेत असे निर्देश मुख्य अभियंता श्री. पवार यांनी यावेळी दिले.

विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाचा आराखडा मंजूर झाला आहे. यामध्ये तीन नवीन स्विचिंग स्टेशन्स, एका स्विचिंग स्टेशनची क्षमतावाढ, ३५ किलोमीटर नवीन भूमिगत वाहिन्या, ज्या वीजवाहिन्या अतिभारित आहे त्यांचे विभाजन करून नवीन वीजवाहिन्या टाकणे, सहा नवीन रिंग मेन युनिट आदींचे कामे होणार आहेत. त्यामुळे चाकण एमआयडीसीमधील सुमारे ३२०० औद्योगिक ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाला महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. हरीहर घोटवाड, चाकणचे उपकार्यकारी अभियंता श्री. विजय गारगोटे, सहायक अभियंता श्री. रामप्रसाद नरवाडे, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी सर्वश्री विवेक ठिगळे, आशिष निचड, विवेक पाचपांडे, आशिष बडनेरकर, प्रशांत डहाके आदींची उपस्थिती होती.

