पुणे :वीज कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही यासाठी सतर्क राहून सदोदित काळजी घ्यावी. तसेच धकाधकीच्या वीजक्षेत्रात काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व नियमित वैद्यकीय तपासणी करावी असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले.
महावितरणच्या पुणे परिमंडल व जहांगीर रुग्णालयाच्या वतीने मंगळवारी (दि. १५) रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अभियंता सचिन तालेवार बोलत होते. शिबिराला अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत, जहांगीर रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी संदीप दत्तो, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता मधुकर घुमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये वीजसुरक्षेबाबत विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच विद्युत अपघात किंवा ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर घ्यायची काळजी, प्रथमोपचार, कृत्रिम श्वासोश्वास आदींची माहिती जहांगीर रुग्णालयाचे वरुण कृष्णन व सहकाऱ्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटणी यांनी केले. शिबिराला रास्तापेठ विभागातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.