पुणे : नादुरुस्त रोहित्रामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त रोहित्र तयार ठेवावीत. तसेच नादुरुस्त झालेले रोहित्र शहरी भागात 24 तास तर ग्रामीण भागात 48 तासांत बदलून द्यावेत असे निर्देश महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांचा विद्युत विषयक कामांचा आढावा प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी नुकताच घेतला. यात पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलातील अभियंता व अधिकार्यांना याबाबत त्यांनी निर्देश दिले. नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती करून ते अतिरिक्त स्वरुपात प्रत्येक परिमंडलात ठेवण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सुरु आहे. नादुरुस्त झालेले रोहित्र बदलण्यासाठी किंवा रोहित्रातील बिघाड दुरुस्तीसाठी वर्ग एक शहरात 18 तास, शहरी भागात – 24 तास व ग्रामीण भागात 48 तासांत कार्यवाही करण्यात यावी. नवीन रोहित्र नेण्यासाठी वाहनाची सोय महावितरणकडून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी दिले आहे.
रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक असलेल्या भागात वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा विद्युत विषयक आढावा घेताना यापुढे अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या जबाबदारीनुसार केलेल्या कामासंबंधी मूल्यमापन करण्यात येणार आहे व त्यानुसार कार्यवाही होणार असल्याचे प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी स्पष्ट केले.
नादुरुस्त झालेले रोहित्र बदलून देण्यास अधिक कालावधी लागत असल्यास तक्रारीसाठी 24×7 सुरु असलेले ग्राहक सेवा केंद्गाचे 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत.
दिवाळीच्या कालावधीत वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे निर्देश
दिवाळी सणाच्या कालावधीत वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अभियंता, कर्मचार्यांनी दक्ष राहावे व मुख्यालय सोडू नये असे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. ज्या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार संबंधीतांवर कारवाई करण्याची सूचना पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलांना करण्यात आली आहे.