- सर्वसामान्य वीजग्राहकांना मिळणार मोठा दिलासा तब्बल ४,६१५ मेगावॅट विजेसाठी निविदा प्राप्त
मुंबई : स्वस्त दरातील वीजखरेदीला प्राधान्य देत नुतनशील ऊर्जेच्या १ हजार मेगावॅट वीजखरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया महावितरणकडून राबविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र स्वस्त दराच्या तब्बल ४ हजार ६१५ मेगावॅट विजेसाठी राज्य व राष्ट्रीयस्तरावरील निविदाधारकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. त्याप्रमाणे महावितरणकडून सौर ऊर्जेसाठी २.४२ रुपये व पवन-सौर संकरित उर्जेसाठी २ रुपये ६२ पैसे दराने वीज खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने येत्या २०२५ पर्यंत राज्यात १७ हजार ३६० मेगावॅट नवीन व नित्यनूतनक्षम ऊर्जास्त्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने अधिकाधिक नुतनशील ऊर्जेची वीजखरेदी स्पर्धात्मक दराने करण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नियोजनातून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे नुतनशील वीजखरेदीसाठी महावितरणला यंदा प्रथमच गेल्या चार वर्षातील स्वस्त दर प्राप्त झालेला आहे.
याआधी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या प्राधान्य दराने (Preferential Rate)नुतनशील ऊर्जा खरेदीच्या बंधनाची पुर्तता करण्यासाठी महावितरणकडून नुतनशील ऊर्जा स्त्रोतांची वीज खरेदी सुरु होती. मात्र आयोगाने निश्चित केलेला प्राधान्य दर हा तुलनात्मक दृष्ट्या इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने परिणामी महागड्या वीजखरेदीचा आर्थिक भुर्दंड महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकांवर पडत होता. त्यानंतर राज्य शासनाच्या संमतीने नुतनशील उर्जास्त्रोतांच्या वीज खरेदीसाठी महावितरणने स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे सौर ऊर्जा, पवनऊर्जा प्रकल्पांकडील वीज खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली.
गेल्या मे महिन्यात महावितरणकडून सौर ऊर्जेच्या ५०० मेगावॅट व पवन-सौर संकरित ऊर्जेच्या ५०० मेगावॅट वीजखरेदीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. या निविदांना उदंड प्रतिसाद देत राज्य व राष्ट्रीयस्तरावरील निविदाधारकांनी सौर ऊर्जेसाठी ३,१६५ मेगावॅट व पवन-सौर संकरित ऊर्जेसाठी १,४५० मेगावॅट विजेच्या निविदा दाखल केल्या. महावितरणने निर्धारित केलेल्या वीजदरापेक्षा या निविदांमध्ये कमी दर प्राप्त झाला, हे उल्लेखनीय. गेल्या जुलै महिन्यात प्राप्त निविदांची उलट बोली प्रक्रिया पूर्ण झाली आणि यामध्ये सौर ऊर्जेसाठी २.४२ रुपये व पवन-सौर संकरित उर्जेसाठी २.६२ रुपये दर प्राप्त झाला. विशेष म्हणजे सौर ऊर्जेसाठी १२ तर पवन-सौर संकरित ऊर्जेसाठी ५ निविदाधारक हे राष्ट्रीय स्तरावरील होते.
आयोगाने निश्चित केलेल्या प्राधान्य दराच्या तुलनेत महावितरणला स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेतून वीजखरेदीसाठी कमी दर प्राप्त झाला आहे. त्यामुळे नुतनशील ऊर्जास्त्रोतांची वीज आणखी स्वस्तदरात खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यायाने महावितरणच्या सर्वसामान्य वीजग्राहकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. याआधी स्पर्धात्मक निविदांद्वारे नुतनशील ऊर्जा स्त्रोतांच्या वीजखरेदीसाठी डिसेंबर २०१८ मध्ये २.७४ रुपये, नोव्हेंबर २०१९ मध्ये २.८९ रुपये व डिसेंबर २०१९ मध्ये २.९० रुपये दर प्राप्त झाला होता. या तुलनेत यंदा सौरसाठी २.४२ रुपये व पवन-सौरसाठी २.६२ रुपये स्वस्त दर प्राप्त झाले आहेतहे विशेष.

