पिंपरी : रावेत परिसरातील वीजपुरवठा सुरळीत आहे. गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे रोहित्र बंद ठेवणे, वीजयंत्रणेची पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती करणे या व्यतिरिक्त काही तुरळक अपवाद वगळता वीजपुरवठा खंडित झालेला नाही असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.
भोसरी विभाग अंतर्गत रावेत परिसरातील सुमारे 14 हजार 500 वीजग्राहकांना एकूण 6 उच्चदाब वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. दि. 14 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय व वीजग्राहकांच्या मागणीनुसार 12 रोहित्रे सुमारे 8 तास बंद ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी दि. 15 ऑक्टोबरला महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब वीजवाहिनीत ट्रीपींग आल्याने महावितरणच्या सॅलेस्टाईल उपकेंद्रातील 4 वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा सकाळी दोन तास खंडित होता.
पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी दि. 31 ऑक्टोबरला आदर्शनगर वाहिनीचा वीजपुरवठा संबंधीत ग्राहकांना मोबाईल ‘एसएमएस’द्वारे पूर्वसूचना देऊन बंद ठेवण्यात आला होता. गेल्या महिन्याभरात रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या सुमारे 80 वैयक्तिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारी स्थानिक तांत्रिक कारणामुळे व लघुदाब वाहिनीशी संबंधीत होत्या. त्याचेही वेळेत निराकरण करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त गेल्या महिन्याभरात रावेत परिसरात वीजवाहिनी किंवा रोहित्रांमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडलेला नाही. महावितरणकडून रावेत परिसरात योग्य प्रकारे देखभाल व दुरुस्तीचे कामे नियमित करण्यात येत असून कोरोना संकट, पावसाळा व अतिवृष्टीच्या कालावधीसह सध्या वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून अहोरात्र सेवा दिली जात आहे.

