पुणे : पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करावी. थकबाकीदार असलेल्या वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 100 टक्के ग्राहकांचा येत्या दि. 29 पर्यंत वीजपुरवठा खंडित करावा असे निर्देश पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे यांनी दिले.
पुणे येथील प्रकाशभवनात सोमवारी (दि. 24) प्रादेशिक विभागामधील पाचही जिल्ह्यातील वीजबिलांची थकबाकी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेसह विविध कामांचा आढावा घेताना प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. पावडे बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. पावडे म्हणाले, वीजग्राहकांना वर्षभरात देण्यात येणाऱ्या सर्वच बाराही वीजबिलांची 100 टक्के वसुली झालीच पाहिजे. जे वीजग्राहक नियमित बिलांचा भरणा करीत नाहीत त्यांचा नियमाप्रमाणे वीजपुरवठा खंडित करावा. थकबाकीसह चालू वीजबिलांच्या 100 टक्के वसुलीसाठी सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करावे. तसेच वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची नियमित तपासणी करण्यात यावी व यात चोरीद्वारे वीज वापरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले. वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी मुख्यालय, प्रादेशिक व परिमंडल कार्यालयावरून विविध पथके पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणमधील संगणकीय प्रणालीद्वारे वीजबिलांचे दैनंदिन निरीक्षण व पर्यवेक्षण केल्यास ग्राहकांकडे पाठविण्यापूर्वीच वीजबिल अचूक असल्याची खात्री करून घेता येते. वीजबिलांच्या दुरुस्तीसाठी वीजग्राहकांना त्रास होतो तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कामाचा वेळ सुद्धा खर्च होतो. महावितरणचा महसूलदेखील अडकून पडतो. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणच्या वेबकन्सोलवर उपलब्ध असलेल्या वीजबिलांच्या संपूर्ण माहितीचे संबंधीत लेखा कर्मचाऱ्यांनी दैनंदिन निरीक्षण केले पाहिजे. तसेच अधिकाऱ्यांनी सुद्धा दैनंदिन पर्यवेक्षण करून बिलींग 100 टक्के अचूक होईल यासाठी प्राधान्य द्यावे व ग्राहकांकडे चुकीचे, सरासरी किंवा सदोष वीजबिल पाठविण्यापूर्वीच त्याच्या दुरुस्तीची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे यांनी दिले.
या बैठकीला अधीक्षक अभियंता सर्वश्री पंकज तगलपल्लेवार (गणेशखिंड, पुणे), प्रकाश राऊत (रास्तापेठ, पुणे), राजेंद्र पवार (पुणे ग्रामीण), अंकुर कावळे (कोल्हापूर), पराग बापट (सांगली), ज्ञानदेव पडळकर (सोलापूर), चंद्रशेखर पाटील (बारामती), उदय कुलकर्णी (सातारा), शंकर तायडे (संचालन), उत्क्रांत धायगुडे, विजय भाटकर, भाऊसाहेब इवरे (इन्फ्रा), सौ. पुनम रोकडे (चाचणी), उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण, उपमहाव्यवस्थापक (एचआर) श्री. अभय चौधरी, सहाय्यक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत, सौ. किर्ती भोसले आदींसह पुणे प्रादेशिक विभागातील कार्यकारी अभियंता, अधिकारी आदींची उपस्थिती होती.

