बारामती : ग्राहकाभिमुख तत्पर सेवा देण्यासोबतच विविध उल्लेखनीय कामे केल्याबद्दल सहाय्यक अभियंता श्री. सचिन रामचंद्र बनकर हे महावितरणच्या राज्यस्तरीय ‘एक्सलेंस अॅवार्ड- 2019-20ʼचे मानकरी ठरले. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू यांच्याहस्ते श्री. बनकर यांना प्रशस्तीपत्र व 10 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सहाय्यक अभियंता श्री. सचिन बनकर हे सध्या बारामती शहर शाखा क्र. 2 मध्ये कार्यरत आहेत. सांगवी (ता. बारामती) शाखेचे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी सन 2018-19मध्ये वीजग्राहकांना तत्पर सेवा देण्यासोबतच मार्च 2019 पर्यंतचे सर्व चालू देयके व थकबाकीची 100 टक्के वसुली केली होती. वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे नियमित कामे व इतर उपाययोजना केल्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात एकही विद्युत अपघात घडला नाही. वीजग्राहक आणि जनमित्रांमध्ये मोबाईल ॲपचा वापर व वीजसुरक्षेच्या जागरुकतेबाबत श्री. बनकर यांनी विशेष प्रयत्न केले. याशिवाय रोहित्रांचे फ्यूज बाॅक्सेस, लघुदाब वाहिन्यांच्या दुरुस्तीमधील खर्चात त्यांनी मोठी आर्थिक बचत केली. यासह इतर विविध कामांची दखल घेऊन राज्यस्तरीय ‘एक्सलेंस अॅवार्ड- 2019-20ʼसाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या अॅवार्डसाठी राज्यभरातून 11 अधिकाऱ्यांची निवड झाली. यामध्ये सहाय्यक अभियंता श्री. बनकर यांचा समावेश आहे. मुंबई येथील मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू यांच्याहस्ते श्री. बनकर यांना गौरविण्यात आले. यावेळी सर्व संचालक श्री. जयकुमार श्रीवास्तव (वित्त), श्री. सतीश चव्हाण (वाणिज्य), श्री. भालचंद्र खंडाईत (प्रकल्प), ब्रिगेडीयर (सेवानिवृत्त) श्री. पवन कुमार गंजू (मानव संसाधन) यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲवार्ड मिळाल्याबद्दल प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे, बारामती मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटील, बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गणेश लटपटे यांनी सहाय्यक अभियंता श्री. सचिन बनकर यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.