मुंबई: महावितरणमध्ये बिलींग असिस्टंट या पदाकरिता कोणत्याही प्रकारची भरती सुरु नाही. तसेच बिलींग असिस्टंट असे पदच महावितरणमध्ये अस्तित्वात नसल्याने या पदाच्या भरतीसाठी जाहिरात देखील काढण्यात आलेली नाही.
परंतु बिलिंग असिस्टंट या पदाकरिता शुल्क भरून ट्रेनिंगसाठी व रूजू होण्याबाबतचा अनधिकृत मेसेज, इमेल किंवा व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. हा मेसेज किंवा इमेलद्वारे आलेला आदेश खोटा व अत्यंत दिशाभूल करणारा असल्याने त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये.
दिशाभूल करणाऱ्या या आदेशामध्ये १० जुलै ते १९ जुलै २०१९ असे पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २५ जुलै रोजी रूजू व्हावे आणि त्याकरिता बँकेत ३० हजार ९६० रूपयांचा भरणा करावा, असे नमूद करण्यात आले आहे. तथापि, महावितरणकडून प्रशिक्षण व रूजू होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.. त्यामुळे अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या इमेल किंवा व्हॉटस् अॅपवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.