पुणे, – महापारेषण कंपनीच्या फुरसुंगी येथील 220/132 केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे कोथरूड 132 केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि. 10) रात्री 8.20 वाजता बंद पडला. यामुळे कोथरूड, वारजे परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत सर्व परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या फुरसुंगी 220/132 केव्ही उपकेंद्रातून कोथरूड 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. आज रात्री 8.20 वाजताच्या सुमारास फुरसुंगी उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोथरूड 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणचे देखील 6 उपकेंद्र बंद पडल्यामुळे प्रामुख्याने कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन, वारजे, शारदा सेंटर, डहाणूकर काॅलनी, काकडे सिटी आदी परिसरातील सुमारे एक लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले. यामध्ये एनसीएल उपकेंद्रांसह इतर विविध उपकेंद्रातून पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये 60 मेगावाॅटपैकी 45 मेगावाॅटचे भारव्यवस्थापन करण्यात आले. सुमारे एक लाख वीजग्राहकांपैकी 60 वीजग्राहकांचा वीजपुरवठा लगेचच सुरु करण्यात आला. तर सुमारे 20 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पाऊण तासांनी सुरु करण्यात आला. उर्वरित 20 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरु असून रात्री उशिरा 10.30 पर्यंत या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे.
———————————-