पुणे, दि. 04 : मुठा नदीच्या पुराचे पाणी सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये शिरल्याने सुरक्षिततेसाठी बंद करण्यात आलेल्या 8 रोहित्रांचा वीजपुरवठा आज पहाटे सहा वाजता सुरु करण्यात आला. मात्र तीन सोसायटींमधील तळमजल्यात पाणी कायम असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत तेथील वीजपुरवठा बंद होता.
बुधवारी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे मुठा नदीला पुर आला व सिंहगड रस्त्यावरील एकता नगर व परिसरातील सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून महावितरणने 8 रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद केला होता. त्यानंतर पुराचे पाणी ओसरल्यानंतर आज सकाळी 6 वाजता या रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र जलपुजन, श्यामसुंदर व साईसिद्धार्थ या तीन सोसायट्यांच्या तळमजल्यात पुराचे पाणी साचले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत सुरक्षिततेचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद होता. तसेच शनिवार पेठमध्ये पुराच्या पाण्यामुळे नाणेघाट येथील दोन मिनी फिडर पिलरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तोही सुरु करण्यात आला आहे.
महापारेषणची फुरसुंगी ते कोथरूड 132 केव्ही वाहिनीत बुधवारी रात्री 09.18 वाजता तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे कोथरूड, वारजे व डेक्कन परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पर्यायी व्यवस्थेतून या परिसराला वीजपुवरठा सुरु करण्यात आला.


