मुंबई :-सौभाग्य योजनेंर्तगत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत राज्यातील सर्वच १० लाख ९३ हजार ६१४ घरांना वीजजोडणी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ३१ डिसेंबर पर्यंत १०० टक्के वीजजोडणी द्यावयाची होती. परंतू महावितरणने हे उद्दिष्ट २७ डिसेंबरलाच पूर्ण केले आहे.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना “सौभाग्य” या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ दि. २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला होता. या योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने दि. ३१ डिसेंबर २०१८ पर्यन्त विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात १०० टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आली. अशा सर्वच लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे.
वीजजोडणी देण्यात आलेल्या एकूण १० लाख ९३ हजार ६१४ घरांपैकी महावितरणने पारंपारिक पध्दतीने १० लाख ६७ हजार ६०३ घरांना तर महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकारण (मेडा) द्वारे उर्वरित २६ हजार ०११ लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. राज्यातील सर्वच ३४ जिल्ह्यात वीजजोडणीचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून सर्वाधिक १ लाख ४८ हजार २६४ वीजजोडण्या पूणे जिल्ह्यात देण्यात आलेल्या आहेत.
सौभाग्य योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले. हे ५०० रुपये संबंधित लाभार्थ्यांकडून त्याच्या बिलातून १० टप्प्यांत वसूल करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पारंपारिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात आला आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रधान सचिव (ऊर्जा) श्री. अरविंद सिंह यांच्या निर्देशानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने सौभाग्य योजनेत १०० टक्के वीजजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.