पुणे : महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. राज्यातील 16 परिमंडलाचे एकूण 8 संयुक्त संघांचे 592 पुरुष व 176 महिला असे एकूण 768 खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्वारगेट येथील कै. बाबुराव सणस क्रीडांगणावर गुरुवारी (दि. 27) सकाळी 9 वाजता या स्पर्धेला थाटात सुरवात झाली. यावेळी सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी पोलिस बॅण्डनेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटन कार्यक्रमाला पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता व स्पर्धेचे मुख्य समन्वयक श्री. सचिन तालेवार, मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले (कोल्हापूर), श्री. सुरेश गणेशकर (औरंगाबाद), श्री. सुनील पावडे (बारामती), श्री.भूजंग खंदारे (मुख्यालय), श्री. ब्रिजपालसिंह जनवीर (नाशिक), श्री. शंकर तायडे (गुणवत्ता चाचणी) श्री. वंदनकुमार मेंढे (महापारेषण), सौ. रंजना पगारे (रत्नागिरी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे उद्घाटक प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले की, खेळ हा प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक होतो. अपयश पचविण्याची व नव्याने उभारी घेण्याची मानसिक शक्ती मिळते. खिलाडूवृत्ती व सांघिक भावना वृद्धींगत होते. संधी मिळाली की त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची उर्जा प्राप्त होते. त्यामुळे ही स्पर्धा महावितरणमधील खेळाडूंसाठी अतिशय महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्री. कमलाकर चौधरी व सौ. मृदुला शिवदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते सर्वश्री सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, पंकज तगडपल्लेवार, वादिराज जहागिरदार उपस्थित होते.
उद्घाटनानंतर लगेचच झालेल्या पुरुष व महिला गटातील 100 मीटर धावस्पर्धेत पुणे-बारामती संघाचे गुलाबसिंग वसावे आणि मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघाच्या प्रिया पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकविला. तर टेनिक्वाईटमध्ये भांडूपच्या प्रियांका उगले प्रथम तर पुण्याच्या शितल नाईक यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
कबड्डीच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघाने अकोला-अमरावती संघावर 36 विरुद्ध 6 गुणांनी विजय मिळविला. यामध्ये विजयी संघाचे परिक्षित शिंदे व नीलेश ठाकूर यांनी चमकदार कामगिरी केली. कबड्डीच्या दुसऱ्या सामन्यात कल्याण-नाशिक संघाने औरंगाबाद-जळगाव संघावर 31 विरुद्ध 26 गुणांनी मात केली. विजयी संघासाठी सचिन कदम व दीपक गुंड यांची कामगिरी महत्वाची ठरली.
बॅडमिंटनच्या पहिल्या फेरीतील सामन्यात लातूर-नांदेड संघाने कल्याण-नाशिक संघावर तर नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाने औरंगाबाद-जळगाव संघावर मात केली व दुसर्या फेरीत प्रवेश केला.
चौकट -क्रिकेटमध्ये कोल्हापूर सुपर ओव्हरमध्ये विजयी – नेहरू स्टेडीयम येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात कोल्हापूर विरुद्ध मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघांनी प्रत्येकी 115 धावा काढून बरोबरी साधली. अत्यंत चुरशीच्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हरचा आधार घेण्यात आला. यामध्ये मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघाने 6 चेंडूवर 6 धावा काढल्या. तर कोल्हापूर संघाने 5 चेंडूतच 7 धावा काढून विजय मिळविला. कोल्हापूर संघाकडून 4 षटकांत 23 धावा देत 3 गडी बाद करणारा राजेश पास्ते सामनावीर ठरला.