पुणे, दि. 04 : महावितरणच्या वीजदेयकांचा ग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’ पाठविण्यासोबतच लवकरच वीजबंद असल्याच्या कालावधीची माहिती ‘एसएमएस’ पाठविण्यात येणार आहे. ही माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे परिमंडलातील 7,39,669 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली असून 2,03,075 वीजग्राहकांनी इमेल आयडींची नोंदणी केली आहे. महावितरणने केलेल्या आवाहनानुसार वीजग्राहकांकडून मोबाईल क्रमांक व इमेल आयडीची नोंदणी करण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्याभरात 41 हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची तर 8498 ग्राहकांनी इमेल आयडींची नोंदणी केली आहे.
पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वीजग्राहकांच्या मोबाईलवर मासिक वीजबिलाची माहिती सध्या प्रायोगिक तत्वावर एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे. ही सुविधा लवकरच ग्रामीण भागातही सुरु होणार आहे. याशिवाय ज्यांनी इमेलद्वारे देयकाची मागणी नोंदविली आहे, त्यांनाही वीजदेयकाचा इमेल पाठविण्यात येत आहे. तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येणार आहे. महावितरणने कर्मचार्यांसाठी तयार केलेल्या कर्मचारी मित्र या मोबाईल अॅपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीजवाहिनीची नोंद घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधीत वीजवाहिनीवरील वीजग्राहकांच्या मोबाईलवर वीजबंदबाबतच्या कालावधीची माहिती ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येणार आहे.
महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा इमेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःचा इमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी 9225592255 क्रमांकाला (बारा अंकी ग्राहक क्रमांक)(वीजग्राहकाचा इमेल) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास इमेल आयडीची नोंदणी होईल. तसेच नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. तसेच महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्गात ग्राहकांना मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय महावितरणच्या 24×7 सुरु असणार्या कॉल सेंटरचे 18002003435 आणि 18002333435 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून कोणत्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येतो. तसेच महावितरणच्या .. या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपवर ही सोय उपलब्ध आहे.

