मुंबई–पारदर्शक आणि तत्पर सेवा देणा–या महावितरणने देशाच्या वीज क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. कागदविरहित झालेल्या महावितरणने आता सर्व कंत्राटदारांची देयके केंद्रीयप्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन अदा करण्यास सुरूवात केली असून लवकरच कर्मचाऱ्यांची देयकेही ऑनलाईन अदा करण्यास येणार आहे. अशी सुविधा उपलब्ध करून देणारी महावितरण ही भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणार आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांचा कंपनीच्या कामकाजात संपूर्ण पारदर्शकतेचा व जास्तीत जास्त ऑनलाईनचा आग्रह असून कंत्राटदार, पुरवठादार यांच्यासोबत कर्मचा–यांनाही त्यांची देयके मिळण्यासाठी कुठेही अडचण होऊ नये यावर त्यांचा विशेष भर आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानासमवेत योग्य सांगड घालून ईआरपी या प्रणालींचा वापर करीत यापूर्वीच पेपरलेस झालेल्या महावितरणने सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन करण्याकडे प्रवास सुरु केला असून महावितरण आता कॅशलेसही झाले आहे.
महावितरणने आपल्या सर्व कंत्राटदार आणि पुरवठादारांची देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास जून २०१८ पासून सुरु केले असून कर्मचा–यांचे वेतन, इतर भत्ते, स्थायी आणि अस्थायी अग्रीम उचल सोबतच आवश्यक कार्यालयीन खर्चाची प्रतिपूर्तीही ऑनलाईन पद्धतीने लवकरच करण्यात येणार आहे, त्याअनुषंगाने महावितरणच्या मुख्यालयात केंद्रीय देयक अदायगी प्रणाली सुरु करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
महावितरणमध्ये कंपनीचे विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार ईआरपी प्रणालीद्वारे करण्यात येत असल्याने कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश आणि पी.ओ. (पर्चेस ऑर्डर) ही ईआरपी मार्फ़त करण्यात येत आहे. त्यात अधिक सुसूत्रता आणून राज्यातील सर्व कंत्राटदारांची देयके मुंबई येथील मुख्यालयातील केंद्रीय प्रणालीव्दारे निश्चित कालमर्यादेत ऑनलाईन पद्धतीव्दारे अदा करण्यात येत आहे.
याशिवाय कर्मचा–यांची अग्रीम उचल, वेतन आणि इतर देयकेही याच प्रकारे ईसीएस प्रणालीव्दारे कर्मचा–यांच्या बॅंक खात्यात वळती करण्यात येतील. यासाठी लागणारी यंत्रणा महावितरणच्या मुख्यालयात कार्यान्वित करण्यात येत आहे. ही प्रणाली पुणे आणि स्थापत्य मंडलांसाठी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली असून त्यास मिळालेले लक्षणीय यश बघून राज्यात इतरत्रही ही पद्धती लवकरच सुरु करण्यात येत आहे. केंद्रीकृत देयक अदायगी प्रणालीमुळे महावितरणच्या विकासकामांना अधिक गती लाभणार असून सोबतच संपुर्ण आर्थिक व्यवहार कॅशलेस आणि पारदर्शक असणारी महावितरण ही भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणार आहे.