पुणे : महावितरणच्या वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा अधिकृत वीजबील भरणा केंद्रातूनच करावा तसेच रक्कम दिल्यानंतर लगेचच पावती अवश्य घ्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्यात काही ठिकाणी दुकानदार किंवा एखादी व्यक्ती अनधिकृतरित्या वीजबिलांची रक्कम वीजग्राहकांकडून घेतल्यानंतर ती महावितरणच्या खात्यात जमा करीत नसल्याने संबंधीत ग्राहकांना पुढील वीजबिलात या रकमेची थकबाकी दिसून येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. थकबाकीमुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात असल्यामुळे वीजबिलाची रक्कम भरूनही ग्राहकांना आर्थिक नुकसानीसह मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पुणे परिमंडलातील सर्व वीजग्राहकांनी महावितरणचे वेबसाईट किंवा मोबाईल अॅप यासह फक्त अधिकृत वीजबिल भरणा केंद्रातूनच वीजबिलाचा भरणा करावा. महावितरणकडून कोणाही एका व्यक्तीला वीज बिल भरणा केंद्र चालविण्याचे अधिकार दिलेले नाहीत.
शहरी व ग्रामीण भागातील कोणत्याही वीजबिल भरणा केंद्रात वीजबिलाची रक्कम भरल्यानंतर तात्काळ पावती घ्यावी. पावतीवरील ग्राहक क्रमांक, पावती क्रमांक, महावितरणचा लोगो आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. पावती मिळत नसल्यास किंवा एक-दोन दिवसांनी देण्यात येईल, असे सांगण्यात येत असेल तर त्या वीजबिल भरणा केंद्गाविरुद्ध संबंधीत कार्यालयात त्वरित तक्रार करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
याशिवाय धनादेशाद्वारे (चेक) एकाच वेळी 15 ते 20 वीजग्राहकांच्या देयकांची रक्कम भरली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही व्यक्ती अनेक ग्राहकांकडून देयकांची रक्कम घेतात व दिलेला चेक बाऊंस व्हावा या हेतुने महावितरणकडे जमा करतात असे संशयास्पद चित्र दिसून येत आहे. परंतु त्याचा वीजग्राहकांना आर्थिक तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका बसत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी कोणत्याही व्यक्तीला देयकाची रक्कम देण्याऐवजी ती स्वतः वीजबील भरणा केंद्गात जमा करावी किंवा ऑनलाईन, मोबाईल अॅपद्वारे देयकांच्या रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.