थकबाकीचा भरणा करण्याबाबत राज्य शासनाचे पत्र
पुणे : पुणे परिमंडलातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी 2 कोटी 99 लाख 95 हजार रुपयांची थकबाकी असून या थकबाकीचा भरणा करण्याबाबत राज्य शासनाने जिल्हा परिषदेला पत्र दिलेले आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणकडून वीजजोडणी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था स्वनिधी किंवा 14 वा वित्त आयोग किंवा इतर निधीतून पथदिव्यांच्या थकबाकीचा भरणा करण्यासंबंधी राज्यातील जिल्हा परिषदांना निर्देश देण्यात आले आहेत. थकबाकीचा भरणा केल्याबाबतची माहितीही राज्य शासनास पाठविण्यात यावी असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव व मुळशी तालुक्यांतील ग्रामपंचायतीच्या हद्दीत पथदिव्यांच्या 1088 वीजजोडण्यांकडे 2 कोटी 99 लाख 95 हजार रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


