पुणे : संततधार व मुसळधार पावसामुळे खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचार्यांनी तत्पर राहावे, असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी दिले आहे.
गुरुवारी (दि. 07) मुख्य अभियंता श्री. मुंडे यांनी पुणे परिमंडलातील विविध कार्यालयांत जाऊन वीजपुरवठ्याबाबत आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. सुनील पावडे, श्री. महेंद्ग दिवाकर यांच्यासह कार्यकारी अभियंता व अधिकारी उपस्थित होते.
मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या साहित्याची कमतरता नाही व ते मागणीनुसार ते पुरविण्यात येईल. तसेच आवश्यक साहित्य खरेदीचे अधिकार उपविभाग, विभाग व मंडल कार्यालयास असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी जुन्या फिडर पिलरमधील वाहिन्यांमध्ये आर्द्गतेमुळे बिघाड होत आहे किंवा होण्याचा धोका आहे त्या ठिकाणी इन्सूलेशन स्प्रे मारण्याची सूचना केली. पावसाचे पाणी साचणार्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार संबंधीतांवर कारवाई करण्याची सूचना अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना करण्यात आली आहे.
दरम्यान, वीज वितरण यंत्रणेची तांत्रिक दुरुस्ती व देखभाल तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी सर्व साहित्यांचा महावितरणकडून पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांवर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कोणतीही आर्थिक जबाबदारी नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात अनेक ठिकाणी विविध संस्थांकडून झालेल्या खोदकामात भूमिगत वाहिन्यांना क्षती पोहोचल्याचे पावसाळ्यात दिसून येत आहे. या खोदकामामुळे पावसाचे पाणी झिरपल्याने उच्च व लघुदाब वाहिन्यांमध्ये आर्द्गता (माईश्चर) निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. याशिवाय रस्त्यांची उंची वाढल्याने कडेच्या फिडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरल्याने वाहिन्यांत आर्द्गता निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले आहे. मुख्य वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत असला तरी रोहित्र किंवा फिडर पिलरच्या भूमिगत लघुदाब वाहिन्यांमध्ये साचलेल्या पाण्याने आर्द्गता निर्माण झाल्याने मुख्यत्वे उत्तमनगर, बाणेर, बालेवाडी, आनंदनगर आदी भागांतील काही सोसायट्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
साधारणतः मान्सूनपूर्व पावसात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आढळून आल्यानंतर यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करण्यात येते. परंतु यंदाच्या पहिल्या पावसाने गेल्या पाच दिवसांपासून संततधार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी दुरुस्ती कामांत व्यत्यय आले होते. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, फांद्या वीजयंत्रणेवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. खोलगट व सखल भागात असलेल्या फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी यंत्रणेत पाणी शिरल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमध्ये दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्गता काढणे, जाईंट करणे आदी कामे अविश्रांत करून महावितरणच्या अभियंता व कर्मचार्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला आहे.
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 तसेच 1912 या तीन टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येणार आहे. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे.