पुणे : पुणे परिमंडलातील वीजबिलांच्या थकबाकीदारांविरोधात महावितरणकडून सुरु असलेल्या ‘शून्य थकबाकी’च्या धडक मोहिमेत 19 हजार 452 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा 10 कोटी 84 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 6 लाख 78 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे असलेल्या 132 कोटी 48 लाख रुपयांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. ही थकबाकी शुन्यावर येईपर्यंत ही मोहीम सलगपणे सुरु राहणार आहे.
पुणे परिमंडलातील 5 लाख 59 हजार घरगुती वीजग्राहकांकडे 75 कोटी 79 लाख रुपयांची सर्वाधिक थकबाकी आहे. तसेच 1 लाख 2 हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे 40 कोटी 30 लाख तर 16 हजार 361 औद्योगिक ग्राहकांकडे 16 कोटी 38 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने आक्रमकपणे ‘शून्य थकबाकी’ मोहीम सुरु केलेली आहे. या मोहिमेत प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे व मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयप्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो जनमित्र सहभागी झाले आहेत.
पुणे शहरात आतापर्यंत 11 हजार 98 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 4 कोटी 46 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांपोटी खंडित करण्यात आला आहे. भोसरी व पिंपरी विभागअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील 3650 वीजग्राहकांची वीज 2 कोटी 44 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आली आहे. मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभाग अंतर्गत मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 4714 ग्राहकांचा वीजपुरवठा 3 कोटी 94 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे. थकीत वीजबिलाच्या रकमेचा भरणा करता यावा म्हणून दि. 10, 11 व 13 फेब्रुवारीला पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्ग कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
ट – कटू कारवाई टाळा, सहकार्य करा – वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीचा भरणा करणे, त्याची पावती संबंधीत कार्यालयात दाखवणे, रिकनेक्शन चार्जेस भरल्यानंतर वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागणार आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्गे तसेच घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.