पुणे : विद्युत अपघात टाळण्यासाठी विजेची घरगुती उपकरणे किंवा सार्वजनिक वीजयंत्रणांपासून सर्तक व सावध राहण्याचा संदेश देण्यासाठी विद्युत सुरक्षा सप्ताहाला गुरुवारी (दि. 11) सुरवात झाली. यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले व प्रभात फेरी काढून विद्युत सुरक्षेचा जागर करण्यात आला.
राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून आयोजित जिल्ह्यातील विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन आज शनिवारवाडा येथे झाले. या कार्यक्रमात जिल्हा विद्युत निरीक्षक श्री. एन. आय. पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, महेंद्ग दिवाकर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर असोशिएशनचे (इकॅम) अध्यक्ष श्री. सुनील गायकवाड, उपाध्यक्ष श्री. मारूती माळी, सचिव श्री. अमर पाटील, इकॅम महासमितीचे उपाध्यक्ष श्री. वामन भुरे, सहाय्यक विद्युत निरीक्षक श्री. डी. टी. थोरात, श्री. शकील सुतार, श्री. श्रीकांत डेकाटे, ‘कमिन्स’चे श्री. शैलेश हत्ती, लिफ्ट कॉन्ट्रॅक्टर असोशिएशनचे सचिव श्री. विठ्ठल सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
विद्युत यंत्रणेत काम करताना वीज दिसत नसल्याने जाणते, अजाणतेने झालेली चूक ही जिवावर बेतू शकते. त्यामुळे विद्युत यंत्रणेतील अपघाताचे धोके टाळण्यासाठी स्वतःच्या सुरक्षेबाबत सतर्कता किंवा सावधगिरी बाळगणे यास सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. विद्युत अपघातातील जीवहानीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होते व कर्मचारी गमावल्याने कंपनीचे तसेच कुटुंबियाचे भरून न येणारे नुकसान होते. विद्युत यंत्रणेपासून सावधानता न बाळगल्याने नागरिकांनाही अनेक कारणांमुळे वीज अपघात होतात. त्यामुळे वीज कर्मचारी असो किंवा सर्वसामान्य नागरिक या सर्वांनी विद्युत यंत्रणेपासून सतर्क राहण्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी प्रमुख वक्त्यांनी केले.
विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन झाल्यानंतर महावितरण, विद्युत निरीक्षक विभाग, इकॅम व औद्योगिक कंपन्या यांच्या संयुक्तपणे सकाळी 9 वाजता विद्युत सुरक्षा रॅली काढण्यात आली. शनिवारवाडा, आप्पा बळवंत चौक, मंडई व बाजीराव रोड परिसरात जनजागृती करीत निघालेल्या या रॅलीच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. पथनाट्याद्वारेही वीजसुरक्षेचा संदेश देण्यात आला. तसेच माहिती पत्रक, माहिती पुस्तिकांचे नागिरकांना वितरण करण्यात आले. या रॅलीत महावितरणचे कार्यकारी अभियंता सर्वश्री किशोर गोर्डे, पराग बापट, दीपक लहामगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कंपन्या व संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.