पुणे: पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागासाठी सिंगल फेजचे नवीन 55 हजार वीजमीटर उपलब्ध झालेले असून येत्या तीन ते चार दिवसांत आवश्यकतेनुसार संबंधीत शाखा कार्यालयांपर्यंत पाठविण्यात येणार आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे परिमंडलासाठी एकूण 55 हजार सिंगलफेज नवीन मीटर उपलब्ध झालेले आहेत. त्यातील 15 हजार पुणे ग्रामीण मंडलअंतर्गत तर रास्तापेठ मंडल व गणेशखिंड मंडलअंतर्गत प्रत्येकी 20 हजार वीजमीटर देण्यात येत आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत शाखा कार्यालयांना आवश्यकतेनुसार हे नवीन मीटर वितरीत करण्यात येत आहे.
हे सर्व नवीन वीजमीटर नवीन वीजजोडणी, जुने सदोष वीजमीटर बदलून देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मागील डिसेंबर महिन्यात पुणे परिमंडल अंतर्गत 11 हजार नवीन वीजमीटर वितरीत करण्यात आले होते. त्यानंतर या महिन्यांत 55 हजार वीजमीटर उपलब्ध झालेले आहेत.
बुधवारी वीजग्राहक तक्रार निवारण दिन
पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (दि. 3 जानेवारी) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी त्वरीत निकाली काढण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांत या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभाग कार्यालयांत सकाळी 11 ते दुपारी एक वाजेदरम्यान कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील आणि त्या निवारणासाठी तात्काळ कार्यवाही करणार आहेत. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

