मुंबई:-
प्रदुषणाची तीव्रता कमी करण्यासाठी उपलब्ध जागेवर वृक्ष लागवड करणे गरजेचे असून शासनाने महावितरणला दिलेले एक लाख वृक्षलागवडीचे लक्ष्य महावितरण येत्या 1 जुलै 2016 रोजी राज्यातील विविध कार्यालयाच्या ठिकाणी वृक्षारोपण करून पूर्ण करणार आहे.
वृक्षारोपण करण्याबरोबर त्याचे संगोपन करणेही काळाची गरज आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक झाडाची महावितरणचे कर्मचारी सर्वतोपरी काळजी घेणार असून या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचारी यांना वाटून देण्यात आली आहे.
राज्यात महावितरणचे 16 परिमंडल, 43 मंडल, 135 विभागीय आणि 3 हजार 52 ची 33 के.व्ही. उपकेंद्रे आहेत. यात 10 मंडल कार्यालये व 100 उपकेंद्रे शहरी भागात असल्याने तेथे जागेअभावी झाडे लावणे शक्य नाही. महावितरणच्या प्रत्येक परिमंडल कार्यालयाने 50, मंडल कार्यालयाने 20, विभागीय कार्यालयाने 100 आणि प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणी 30 अशी एकूण 1 लाख 3 हजार 520 झाडांचे वृक्षारोपण करण्याचे निश्चित केले आहे.
1 जुलै 2016 रोजी करण्यात येणा-या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी महावितरणने पूर्ण तयारी केली असून त्यासाठी खड्डे तयार करण्यात आले आहेत. तसेच वृक्षारोपण करावयाची सर्व रोपेही ताब्यात घेण्यात आली आहेत. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यालयात वरिष्ठ अधिकार्याची नेमणूक करून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे. लोकसहभागातूनही वृक्षारोपण करण्याचे आवाहन महावितरणने आपल्या कर्मचार्यांना आणि वीज ग्राहकांस केले असून वृक्षारोपण कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

