पुणे : पुणे परिमंडलाचे कार्यक्षेत्र असलेल्या हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील 18 हजार 742 कृषीपंपधारकांनी 14 कोटी 41 लाख रुपयांचा भरणा करून वीजबिलाच्या थकबाकीमुक्तीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग नोंदविला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
वीजबिलाच्या थकबाकीमुक्तीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी आता 30 हजारांपेक्षा कमी थकबाकी असल्यास तीन हजार रुपये व 30 हजारांपेक्षा अधिक थकबाकी असल्यास 5 हजार रुपये भरून सहभागी होता येणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना वीजबिल दुरुस्ती करावयाची आहे त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन महावितरणकडून दि. 1 ते 30 डिसेंबरच्या कालावधीत करण्यात येणार आहे.
या योजनेतून पुणे परिमंडलातील 90 हजार 646 कृषीपंपधारक शेतकर्यांना वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे. हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील या कृषीपंपधारकांकडे 231 कोटी 63 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील 185 कोटी रुपयांच्या मूळ थकबाकीचा दिलेल्या हप्त्यांमध्ये चालू वीजबिलांसह भरणा केल्यास 44 कोटी 32 लाख रुपयांचे व्याज व 2 कोटी 30 लाख रुपयांचा दंड माफ करण्यात येणार आहे. आतापर्यंत 18 हजार 742 कृषीपंपधारकांनी 14 कोटी 41 लाख रुपयांचा भरणा करून या योजनेत सहभाग नोंदविला आहे.
थकबाकीदार कृषीपंपधारकांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

