पुणे: महावितरणमधील मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापन लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वतंत्र प्रणालीद्वारे सुरु होणार आहे अशी माहिती महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. सचिन ढोले (मुंबई) यांनी दिली.
रास्तापेठ येथे मानव संसाधन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. 27) आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, श्री. विजय भाटकर, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र म्हंकाळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर आदींची उपस्थिती होती.
कार्यकारी संचालक श्री. सचिन ढोले म्हणाले, की स्वतंत्र प्रणालीमध्ये महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची माहिती सहजतेने उपलब्ध असेल व त्यात आवश्यक बदलही सूचवता येईल. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सेवांमधील रजा, भविष्यनिर्वाह निधी, विविध देयके, शिस्तभंग कारवाई, गोपनीय अहवाल आदींची माहिती या प्रणालीत उपलब्ध राहणार आहे. यासह कार्यालयीन कामकाज तसेच कार्यपद्धतीत वेग व सुलभता आणण्यासाठी सुमारे 60 प्रकारच्या सेवा देणारी ही स्वतंत्र प्रणाली विकसीत करण्यात येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा या प्रणालीत समावेश असल्याने मानव संसाधन विभागाचे कामकाज अधिक गतीमान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक (लेखा व वित्त) सौ. माधुरी राऊत, कार्यकारी अभियंते आदींसह मानव संसाधन विभागातील अधिकारी उपस्थित होते.