1925 ग्राहकांना नवीन वीजजोडणी तर 6 कोटी 18 लाखांच्या थकबाकीचा भरणा
पुणे : थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या पुणे परिमंडलातील 689 वीजग्राहकांकडे अनधिकृत व चोरीद्वारे वीजपुरवठा सुरु असल्याचे आढळून आले आहे. यातील 63 जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे परिमंडलातील 7 हजार 327 वीजग्राहकांनी थकबाकीपोटी 6 कोटी 18 लाख रुपयांचा भरणा केला असून त्यापैकी 1925 वीजग्राहकांना मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
पुणे परिमंडलातील डिसेंबर 2015 अखेरपर्यंत देयकांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजग्राहकांकडे वीजवापराबाबत तपासणी मोहीम सुरु आहे. या मोहिमेत सर्व वर्गवारीमधील 32 हजार 433 वीजग्राहकांकडे तपासणी केली असता 24 हजार 417 वीजग्राहकांकडे वीजवापर नसल्याचे दिसून आले. तथापि, 689 वीजग्राहकांकडे अनधिकृत व वीजचोरीद्वारे 2 कोटी 43 लाख रुपयांच्या विजेचा प्रत्यक्षात वापर झाल्याचे दिसून आले. यातील 63 वीजग्राहकांविरुद्ध कलम 135 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उर्वरित 626 जणांविरुद्ध कलम 126 व 135 अन्वये कारवाई सुरु आहे.
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या 7327 वीजग्राहकांनी 6 कोटी 18 लाख रुपयांच्या थकीत देयकांचा भरणा या मोहिमेत केला आहे. त्यातील 1925 वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर नव्याने वीजजोडणी देण्यात आली आहे. यात गणेशखिंड मंडल-186, पुणे ग्रामीण मंडल- 392 तर रास्तापेठ मंडलमधील 1347 वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
वीजदेयकांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजग्राहकांनी अनधिकृतपणे किंवा वीजचोरीद्वारे विजेचा वापर करू नये थकबाकीचा भरणा करून अधिकृत वीजजोडणीद्वारे वीजवापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.