पुणे : वीजयंत्रणेत फेरफार करून इलेक्ट्रॉनिक्स सर्कीटच्या माध्यमातून रिमोटद्वारे सुरु असलेली चाकण (ता. खेड) येथील दास एन्टरप्रायजेस या कारखान्यातील 18 लाख 38 हजार 881 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. याप्रकरणी कारखान्याचे संचालक राजेंद्ग गणपत धाडगे विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकण येथे तळेगाव रस्त्यावर मे. दास एन्टरप्रायजेस हा डायकास्टींग व मशिनिंगचा कारखाना आहे. उच्चदाब वीजजोडणी असलेल्या या कारखान्यातील वीजवापराबाबत अद्यावत तंत्रज्ञानातून केलेल्या विश्लेषणात संशय निर्माण झाला होता. त्यानुसार कारखान्यातील वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात वीजमीटर यंत्रणेतील वायरिंगमध्ये फेरफार करून सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) सर्कीटकडे जाणारे वायर्स ब्रेक करून त्यामध्ये रिमोट कंट्रोलचे सर्कीट समाविष्ट केल्याचे आढळून आले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत असल्याचे दिसून आले. अशा अनधिकृत रिमोट कंट्रोलद्वारे दास एन्टरप्रायजेस कारखान्यात एकूण 1,38,490 युनिटची म्हणजे 18 लाख 38 हजार 889 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
या कारखान्यातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे (पुणे ग्रामीण मंडल), श्री. रमेश मलामे (चाचणी मंडल), उपमहाव्यवस्थापक श्री. एकनाथ चव्हाण (माहिती व तंत्रज्ञान), कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे (राजगुरुनगर), श्री. सुरेश वानखेडे (चाचणी), उपकार्यकारी अभियंता श्री. मंगेश सोनवणे, अरविंद राऊत, सहाय्यक अभियंता श्री. एन. एस. रासकर, श्री. आर. के. पाटील तसेच तंत्रज्ञ श्री. अरविंद गव्हाणे, श्री. आर. एस. कहार आदींनी योगदान दिले.
दास एन्टप्रायजेस कारखान्यातील वीजचोरीप्रकरणी संचालक राजेंद्ग गणपत धाडगे विरुद्ध रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135, 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

