पुणे : विजेच्या सुरळीत पुरवठ्यासाठी बिघाडरहित वीजयंत्रणेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्यास किंवा दुरुस्ती कामात हयगय झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिला.
गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’त मंगळवारी (दि. 10) वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी उपाययोजनांची आढावा बैठक झाली. यावेळी प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे बोलत होते. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. भोसरी विभागात गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमिवर ही बैठक घेण्यात आली.
प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले, की बिघाडांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास वीजग्राहकांना त्रास होतो. सोबतच महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीअभावी यंत्रणेत बिघाड व वीजपुरवठा खंडित झाल्यास सहन केले जाणार नाही. देखभाल व दुरुस्ती हे नियमित स्वरुपाचे काम आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणार्यांविरुद्ध कारवाई निश्चितपणे होणार आहे. बिघाडरहित यंत्रणेसाठी उपाययोजना करण्यासाठी महावितरणकडे कोणत्याही साहित्याची कमतरता नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वीजयंत्रणेची पाहणी करून वारंवार होणारे बिघाड कायमस्वरुपी दुरुस्त करण्याचे काम प्राधान्याने करण्यात यावेत. येत्या 10 दिवसांत बिघाडरहित व सक्षम वीजयंत्रणेसाठी उपाययोजना कराव्यात. तसेच यंत्रणेच्या दुरुस्ती कामात स्थानिक अभियंत्यांनी व आवश्यकतेनुसार वरिष्ठांनीही उपस्थित राहण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी यावेळी दिले. रस्ते किंवा इतर खोदाई कामात भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्याची देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात यावी. शिवाय बेजबाबदारपणा किंवा हयगय केल्याने यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण व दुरुस्तीकामांचा कालावधी वाढल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी सांगितले. रस्ते किंवा इतर खोदाई कामात वीजवाहिनीचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधीत एजंसीविरुद्ध फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. मदन शेवाळे, श्री. गौतम गायकवाड, श्री. दीपक लहामगे आदींसह अभियंते उपस्थित होते.
काही वीजग्राहकांकडूनही चुकीची माहिती – देखभाल व दुरुस्ती तसेच विविध उपाययोजनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे व यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. परंतु काही वीजग्राहकांद्वारे चुकीची माहिती वरिष्ठांकडे हेतुपुरस्सरपणे पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. बाणेर बालेवाडी परिसरात गेल्या 10 दिवसांत 10 पैकी 9 वीजवाहिन्यांमध्ये एकदाही बिघाड झाल्याचा प्रकार घडला नाही. तर उर्वरित एक वाहिनीवर पावसामुळे 20 मिनिटे वीजपुरवठा खंडित होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.