पुणे : दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याची जेसीबीने साफसफाई करताना महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने महापारेषणचे 132 केव्ही जीआयएस तसेच महावितरणच्या सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी पुणे शहरातील रास्तापेठ, कसबा पेठ व इतर सर्व पेठांसह लुल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट आदी परिसरातील वीजपुरवठा गुरुवारी (दि. 21) दुपारी अडीचच्या सुमारास विस्कळीत झाला व त्याचा सुमारे अडीच लाख वीजग्राहकांना फटका बसला आहे.
दरम्यान, महावितरणकडून इतर उपकेंद्रांद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तथापि 70 ते 80 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने या सर्व परिसरात पुढील दोन दिवस नाईलाजास्तव 3 ते 4 तासांचे चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून भूमिगत वीजवाहिनीद्वारे रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. या उपकेंद्रातील आऊटगोंईंग वाहिन्यांद्वारे महावितरणच्या सेंटमेरी, कसबा पेठ, मंडई, लुल्लानगर, गुलटेकडी व रास्तापेठ या सहा उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु बुधवारी (दि. 20) रात्री दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याची जेसीबीने सुरु असलेल्या साफसफाईच्या कामात सिमेंटचे काॅक्रीट उखडण्यात आले व महापारेषणच्या भूमिगत वीजवाहिनीचे नुकसान झाले. त्यानंतर रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे वाहिनीमध्ये आर्द्रता वाढली व आज दुपारी अडीचच्या सुमारास या भूमिगत वाहिनीचा स्फोट झाला. त्यामुळे महापारेषणच्या रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी या उपकेंद्रांतून महावितरणच्या 6 उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, बुधवार पेठ, नवीपेठ, सदाशिव पेठ, गंजपेठ यासह सर्व पेठा, लुल्लानगर, कोंढवा, कॅम्प, गुलटेकडी, मंडई, मुकुंदनगर, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, रहेजा गार्डन, सॅलीसबरी पार्क, गुलटेकडी, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, स्वारगेट, जिल्हाधिकारी कार्यालयाचा काही परिसर, पर्वती आदी परिसरातील सुमारे अडीच लाख ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला.
महावितरणच्या सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद असल्याने सुमारे 70 ते 80 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून या संबंधीत परिसरातील सर्व वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु झाले आहेत. इतर उपकेंद्रांमधून पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली. तथापि विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने काही परिसरांमध्ये नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीचे भारनियमन सुरु करण्यात आले आहे. खोदकामात नादुरुस्त झालेली महापारेषणची वीजवाहिनी विशिष्ट प्रकारची आहे. वाहिनीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा जाईंट चेन्नई येथून विमानाने मागविण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 22) या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापारेषणकडून सुरु होईल.
महापारेषणच्या या भूमिगत वाहिनीच्या दुरुस्ती कामास तसेच बंद पडलेले 132 केव्ही जीआयएस व इतर सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत वीजपुरवठा विस्कळीत झालेल्या सर्व परिसरात महावितरण नाईलाजास्तव आपात्कालिन परिस्थितीमुळे 3 ते 4 तासांचे चक्राकार भारनियमन करावे लागणार आहे. भारनियमन टाळण्याचा किंवा त्याचा कालावधी कमीतकमी राहील असा प्रयत्न महावितरणकडून सुरु आहे. या कालावधीत सर्व वीजग्राहकांनी विजेचा वापर आवश्यकतेनुसार व कमीतकमी करावा तसेच उद्योग किंवा व्यावसायिकांनी विजेएेवजी शक्य असल्यास जनरेटरचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे. विजेच्या कमीतकमी वापराने महावितरणला विजेचे भारव्यवस्थापन शक्य होईल व विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच नाईलाजास्तव करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या चक्राकार भारनियमनासाठी महावितरण दिलगीर असून या आपात्कालिन परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.