पुणे : लवकरच सुरु होणार्या पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या सर्वच विभागांतर्गत मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत.
मान्सूनपूर्व कामांत आवश्यकतेनुसार उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्राची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच डिस्क इन्सूलेटर बदलणे, तारा ओढणे, उपकेंद्ग देखभाल, वाकलेले वीजखांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले वीजखांब बदलणे, ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, ऑईल फिल्टरेशन, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची कटाई, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजतारा बदलणे आदी कामांचा समावेश आहे.
महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीमधील वीजवाहिन्यांना थेट धोका निर्माण करणार्या झाडांच्या फांद्यांची कटाई करण्यात येते. तथापि वीजवाहिन्यांपासून दूर अंतरावर असलेल्या आणि खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जमीनीवरील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणार्या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधीतांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्गाचे 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 हे दोन टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येणार आहे. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे कोणतेही तीन मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक रजिस्टर्ड करण्याची सुविधा आहे. यानंतर रजिस्टर्ड मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकावरून तक्रार नोंदविण्यासाठी फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. स्थानिक तक्रार निवारण केंद्गे कायमस्वरुपी बंद केल्याने ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावरच तक्रार नोंदवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.