पुणे, दि. 04 : जेसीबीने सुरु असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेजच्या खोदकामात महावितरणची 11 केव्हीची भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने शुक्रवारी (दि. 04) संगमवाडी, रेल्वे स्टेशन परिसरात सव्वा दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान, या खोदकामाबाबत महावितरणला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. वीजवाहिनी तोडल्याने वीजविक्री व दुरुस्ती खर्च यात महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय वीजग्राहक व इतर नागरिकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
याबाबत माहिती अशी, की नायडू हॉस्पीटलजवळ पुणे महानगरपालिकेकडून ड्रेनेज पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी जेसीबीने खोदकाम सुरु होते. नायडू उपकेंद्गातून निघालेली 11 केव्ही भूमिगत वाहिनी जेसीबीच्या खोदकामात तोडल्याने दुपारी 3.40 वाजता रेल्वे स्टेशन परिसर, आरटीओ कार्यालय परिसर, संगमवाडी, प्रायव्हेट रोड आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर पर्यायी व्यवस्था व भारव्यवस्थापनातून सायंकाळी 6 वाजता या सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला.
महावितरणची वीजयंत्रणा किंवा भूमिगत वीजवाहिन्यांजवळ करण्यात येणार्या खोदकामाची पूर्वकल्पना देण्यात यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. जेणेकरून वीजयंत्रणेचे नुकसान होणार नाही व वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टळतील यासाठी खोदकामास संपूर्ण सहकार्य केले जाईल. त्यामुळे वीजयंत्रणेचे नुकसान व वीजग्राहकांची गैरसोय होणार नाही. दरम्यान, तुटलेल्या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम त्वरीत सुरु करण्यात असून रात्री 9 वाजेपर्यंत ते पूर्ण होणार आहे.