पुणे : पुणे परिमंडलातील नवीन वीजजोडण्या तसेच सदोष वीजमीटर बदलण्यासाठी या महिन्यात सिंगल फेजच्या 23 हजार नवीन वीजमीटरचे संबंधीत कार्यालयांना वाटप करण्यात आले असून सद्यस्थितीत 17400 नवीन मीटर भांडार विभागात उपलब्ध आहेत. त्यामुळे पुणे परिमंडलामध्ये वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या खोट्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात नवीन वीजजोडणी, सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी गेल्या एप्रिल 2017 पासून आतापर्यंत एकूण सिंगले फेजचे 64,750 नवीन वीजमीटर परिमंडल अंतर्गत कार्यालयांना वितरीत करण्यात आलेले आहेत. तर जुलै महिन्यातील मागणीनुसार गणेशखिंड मंडल व पुणे ग्रामीण मंडलमध्ये प्रत्येकी 8000 व रास्तापेठ मंडलमध्ये 7000 असे सिंगल फेजचे एकूण 23,000 नवीन वीजमीटर देण्यात आलेले आहेत. दि. 22 जुलैला गणेशखिंड – 5595, रास्तापेठ – 6031 व पुणे ग्रामीण मंडलमध्ये 9186 असे एकूण 20812 मीटर उपलब्ध असताना मागणीनुसार मंगळवारी (दि. 25) आणखी प्रत्येकी 5 हजार मीटर वितरीत करण्यात आले आहे. दि. 10 जुलैपर्यंत या तिनही मंडलमध्ये सिंगलफेज पेडपेडींगच्या नवीन वीजजोडण्यांसाठी 19,219 मीटरची आवश्यकता होती.
शिवाय या व्यतिरिक्त नवीन वीजजोडणी किंवा सदोष मीटर बदलण्यासाठी सद्यस्थितीत पुणे परिमंडलासाठी सिंगल फेजचे 17,400 नवीन वीजमीटर भांडार विभागात उपलब्ध आहेत. मुख्यालयातूनसुद्धा वीजमीटरचा मागणीनुसार पुरवठा होत असल्याने वीजमीटरचा कुठलाही तुटवडा नाही. महावितरणने मटेरियल मॅनेजमेंटची प्रक्रिया ही ‘ईआरपी’च्या (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून ‘ऑनलाईन’ झालेली आहे. त्यामुळे साधनसामग्रीची उपलब्धता व पुरवठा ही प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक गतिमान झालेली आहे. वीजमीटरचा तुटवडा असल्यामुळे ते उपलब्ध नाही, अशा खोट्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.