पुणे: नगररोडवरील एअर फोर्सच्या नाईन-बीआरडीजवळ डक्टमधील महावितरणच्या 11 वीजवाहिन्या जळाल्याने सोमवारी (दि. 24) पहाटे साडेचार वाजता सुमारे 42 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी 11 वाजेपर्यंत 16 हजार तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत 10 मोठे ग्राहक वगळता उर्वरित सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला आहे.
नगररोडवरील एअर फोर्स स्टेशनच्या नाईन-बीआरडीलगतच पुणे महानगरपालिकेच्या डक्टमधील महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या तब्बल 11 वीजवाहिन्या आज पहाटे साडेचारच्या सुमारास जळाल्या. एका वाहिनीमधील जाईंटमध्ये स्पार्किंग झाल्यानंतर डक्टमधील कॉन्क्रिटीकरणासाठी वापरलेल्या लाकडी फळ्यांनी पेट घेतला. त्यामुळे डक्टमध्ये आग पसरली व 11 वाहिन्या जळाल्या. परिसरातील 5 उपकेंद्गांचा वीजपुरवठा बंद पडल्याने विमाननगर, शास्त्रीनगर, कल्याणीनगर, येरवडा, संजय पार्क, वडगाव शेरी, आयटी पार्क आदी परिसरातील सुमारे 42 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने पर्यायी व्यवस्थेतून सकाळी 11 वाजता सुमारे 16 हजार तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत उर्वरित सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु केला. तथापि, विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने मोठे हॉटेल्स, मॉल, आयटी पार्क अशा 10 उच्चदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ववत होऊ शकला नाही. दुरुस्तीचे काम या आज पहाटेपासूनच सुरु करण्यात आले. मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. किशोर पाटील यांनी उपस्थित राहून दुरुस्ती कामाला वेग दिला. सायंकाळी उशिरापर्यंत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरु होते. या कामात महावितरणचे 10 अभियंता व सुमारे 85 कर्मचारी सहभागी झाले आहेत.
चौकट (फोटोसह)- डक्टमधील लाकडी फळ्यांनी केले मोठे नुकसान – पुणे महानगरपालिकेने नाईन-बीआरडीजवळ तयार केलेल्या डक्टवर कॉक्रीटचा स्लॅब टाकण्यासाठी त्याला डक्टच्या आतून लाकडाच्या फळ्यांचा आधार देण्यात आला. काम झाल्यानंतर या फळ्या डक्टमध्येच राहिल्या. एका 22 केव्ही वाहिनीच्या जाईंटमध्ये स्पार्कींग झाल्यानंतर लाकडाच्या फळ्यांनी पेट घेतला व तब्बल 11 वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे महावितरणचे सुमारे 12 लाखांचे नुकसान झाले व वीजग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्याची झळ बसली.