मुंबई :-
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) विशेष पथकाने वीजचोरी विरोधात राबविलेल्या मोहिमेत सुमारे 2 कोटी 29 लाख रूपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरणचे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक श्री. अरविंद साळवे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात वीजचोरी विरूध्द विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मे. हिमलक्ष्मी आईस फॅक्टरीत रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. त्यांनी एकूण 58 लाख 24 हजार 200 रुपयांची वीजचोरी केली. मे. वासीम आईस फॅक्टरीत 83 लाख 70 हजार 80 रूपयांची तर मे. वाजीद आईस फॅक्टरीत 87 लाख 96 हजार 308 रूपयांची वीजचोरी केल्याचे यावेळी आढळून आढळून आले. या तीनही आईस फॅक्टरीची वीजचोरीची एकूण रक्कम सुमारे 2 कोटी 29 लाख एवढी आहे.
या प्रकरणी संबंधित तीनही व्यावसायिकांवर विद्युत अधिनियमाच्या कलम 135 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कार्यकारी संचालक श्री अरविंद साळवे (IPS) तसेच कोंकण परिक्षेत्राचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंते सुनिल कळमकर व आर. व्ही. देठे यांच्या विशेष पथकाने ही कार्यवाही केली. यापुढे वीजचोरी विरुध्दची मोहिम तीव्र करणार असल्याचे अरविंद साळवे यांनी सांगितले आहे.