पुणे : पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट तर महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह शासकीय व अशासकीय सदस्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
महावितरणचा कारभार पारदर्शक व प्रभावीपणे चालविण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी राज्य शासनाने जिल्हा व तालुका विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांनी ही समिती नुकतीच गठीत केली आहे.
पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे सदस्य म्हणून जिल्ह्यातील सर्व आमदार, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त, विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुखांसह महावितरणचे अधीक्षक अभियंता तसेच घरगुती, व्यापारी, औद्योगिक व कृषी ग्राहकांच्या प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यात अशासकीय सदस्य म्हणून श्री. संतोष रमाकांत सौंदणकर (व्यावसायिक), श्री. राजेंद्ग संभाजी भुजबळ (औद्योगिक), श्री. भरत नारायण कुंभारकर (कृषी), श्री. विश्वास सोपानराव ननावरे (घरगुती) तसेच वीज वितरण क्षेत्रात कार्यरत असणारे श्री. नितीन नारायणशेठ गुजराथी व श्री. महेंद्ग दगडू कांबळे या ग्राहक प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध वीज विषयक बाबींचा समितीच्या माध्यमातून त्रैमासिक आढावा घेण्यात येणार आहे. या समितीच्या सूचना तसेच शिफारशी महावितरणच्या वतीने शासनास्तरावर पाठविण्यात येणार आहे


