पुणे : सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्याचे काम गेल्या मार्चपासून सुरु आहे. या सुरक्षा आवरणामुळे रोहित्रापासून असलेला सार्वजनिक धोका कमी होणार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागातील एकूण 744 धोकादायक रोहित्रांना सुरक्षा आवरण लावण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी 42 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. आतापर्यंत 100 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावण्यात आलेले आहेत. रोहित्रांच्या चारही बाजुने तसेच रोहित्राखाली लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरणामुळे वीजखांबावरील रोहित्रांमध्ये बिघाड, ऑईल गळती, स्पार्कींग आदींमुळे परिसरातील धोका कमी होणार आहे.
गणेशखिंड मंडलातील पिंपरी, कोथरूड, भोसरी, शिवाजीनगर विभागात एकूण 352 रोहित्रांना तर रास्तापेठ मंडलातील नगररोड, पद्मावती, पर्वती, रास्तापेठ, बंडगार्डन विभागांत एकूण 137 तर पुणे ग्रामीण मंडलातील मंचर, राजगुरुनगर, मुळशी विभागात 255 धोकादायक रोहित्रांना सुरक्षा आवरण लावण्यात येत आहे.
महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थामुळे छोटे प्राणी तेथे येतात व वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो किंवा प्राण्याचा नाहक जीवही जातो. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे तसेच वीजयंत्रणेच्या परिसरात किंवा कपाऊंडमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे असे आवाहन महावितरणने केले आहे.