पुणे : काही दिवसांवर आलेल्या पावसाळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरणने पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरु केलेली वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत.
पुणे परिमंडलात गुरुवारी (दि. 18) आवश्यक असलेल्या ठिकाणी व संबंधीत परिसरातील वीजग्राहकांना वीजबंदची पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात आली. यात संबंधित अभियंता व कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी कोथरूड, शिवाजीनगर, भोसरी, पिंपरी विभागांतील विविध वीजयंत्रणेच्या ठिकाणी व उपकेंद्गांना तसेच चाकण एमआयडीसी येथे भेटी दिल्या व दुरुस्ती कामांची पाहणी केली. यावेळी पुणे ग्रामीणचे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्ग पवार उपस्थित होते.
पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे धोके टाळण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना सुरु आहेत. यात प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणार्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. रोहित्र तसेच वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे.
खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधीतांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.
पावसाळ्यात वीजतारांवर, खांबांवर झाडे पडून, पूरपरिस्थिती किंवा अतिवृष्टीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांतर्गत साधनसामुग्रीसह फिरते पथक तयार ठेवण्यात निर्देश मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी दिलेले आहेत.

