पुणे : जेसीबीने सुरु असलेल्या खोदकामात महावितरणची 22 केव्हीची भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने गुरुवारी (दि. 18) बंडगार्डन परिसरातील सुमारे चार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी 12.41 वाजता खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे.
याबाबत माहिती अशी, की नायडू हॉस्पीटलच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमीजवळ हॉटेल शेरेटनच्या ड्रेनेज पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यासाठी खासगी कंत्राटदाराकडून जेसीबीने खोदकाम सुरु होते. यात महावितरणच्या नायडू उपकेंद्गाला वीजपुरवठा करणारी 22 केव्हीची एक वीजवाहिनी दुपारी 12.41 वाजता तुटली आणि ढोले पाटील रोड, बोट क्लब, बंडगार्डन रोड, गुगल लेन, माणिकचंद आयकॉन, लडकतवाडी परिसरातील सुमारे 4 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. नायडू उपकेंद्रातून भारव्यवस्थापन शक्य नसल्याने पर्यायी व्यवस्थेतून या परिसराला वीजपुरवठा उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही. तुटलेल्या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम त्वरीत सुरु करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे


