पुणे: पुणे परिमंडलात वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य ग्राहकांनी आणून देण्याची गरज नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सदाशिव पेठेतील नीलसदन या सोसायटीला वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी साहित्य मागितल्याप्रकरणी संबंधित जनमित्रास गुरुवारी (दि. 18) निलंबित करण्यात आले तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच महावितरणकडून या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी आज नीलसदन सोसायटीमध्ये जाऊन मेजर जनरल (सेवानिवृत्त) श्री. एस. सी. एन. जठार यांची भेट घेतली व दुरुस्तीसाठी साहित्य मागितल्याप्रकरणी माहिती घेतली.
पुणे परिमंडलातील मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पावसाळी परिस्थितीमध्ये वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक व पुरेसे साहित्य सर्व मंडल व विभाग कार्यालयांकडे उपलब्ध आहेत. याशिवाय आपत्कालिन परिस्थितीत आवश्यक दुरुस्तीच्या कामांसाठी कंत्राट देण्यात आले असून कंत्राटदारांना टर्न-की बेसीसवर (आवश्यक साहित्याच्या पुरवठ्यासह) देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आलेले आहे. मुख्य कार्यालयाकडून आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध होत असून परिमंडल, मंडल व विभाग कार्यालयांना आवश्यक सुरक्षा साधने तसेच तांत्रिक साहित्य खरेदीचेही अधिकार आहेत. वीज वितरण यंत्रणेची तांत्रिक दुरुस्ती व देखभाल तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी सर्व साहित्यांचा महावितरणकडून पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांवर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कोणतीही आर्थिक जबाबदारी नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

