पुणे : वादळाच्या तडाख्याने विस्कळीत झालेला नारायणगाव व परिसरात बहुतांश भागातील वीजपुरवठा महावितरणचे अभियंता व कर्मचार्यांच्या अविश्रांत प्रयत्नांतून सुरळीत झालेला आहे. सद्यस्थितीत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु असून उर्वरित 50-55 कृषीपंपाचा वीजपुरवठा येत्या दोन दिवसांत पूर्ववत करण्यात येणार आहे.
मंचर विभागातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यामध्ये दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास जोरदार वादळाने थैमान घातले. या वादळामुळे झाडे व मोठ्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्या. यात नारायणगाव व परिसरात तब्बल 98 वीजखांब कोसळले तर झाडे, फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी वीजवाहिन्याही जमीनदोस्त झाल्या. नारायणगाव उपविभागातील सर्वच 10 उपकेंद्गांचा वीजपुरवठा खंडित झाला होता व 40 हजार वीजग्राहकांना त्याचा फटका बसला होता.
महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी लगेचच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्ती कामांना वेग दिला. वीजखांब उभे करणे, वीजवाहिन्यांची दुरुस्ती, तात्पुरत्या किंवा पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठ्याची सोय करण्यात आली. वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी नवीन वीजखांब व इतर आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात आले. रात्रंदिवस काम करून केवळ दोन दिवसांत काही कृषीपंप वगळता अन्य सर्व वर्गवारीतील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर कृषीपंपांना वीजपुरवठा करणार्या वीजयंत्रणेचीही दुरुस्तीला वेग देण्यात आला. सद्यस्थितीत वादळाच्या तडाख्याने अक्षरशः भूईसपाट झालेल्या वीजयंत्रणेची उभारणी सुरु असून त्यातून येत्या दोन दिवसांत उर्वरित 50-55 कृषीपंपांचाही वीजपुरवठी सुरळीत करण्यात येणार आहे.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी येडगाव येथे नुकतीचे भेट दिली व वीजयंत्रणेच्या दुरुस्तीची पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर, उपकार्यकारी अभियंता श्री. उमेश करपे आदींची उपस्थिती होती.

