पुणे : ‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कारटं’अशी मराठीत म्हण आहे ,हि म्हण आता महाराष्ट्रातील मराठी कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याचा जणू निर्धार केला असावा . घराणेशाही संपवा म्हणणाऱ्या पंतप्रधानांना त्यांच्याच पक्षातील देवेंद्र फडणवीसांची घराणेशाही राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी दाखवून दिली आहे. म्हणतात ना हा सूर्य आणि हा जयद्रथ .. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? अर्थात यावर मोदी उत्तर देणार नसले तरी त्यांची घराणेशाही बाबतची ओरड निव्वळ कुचकामी आहे हे सकाळी अजित पवारांनी आपल्या सभ्य शब्दात सांगितले आणि संध्याकाळी त्यांच्याच पक्षात कार्यरत झालेल्या रुपाली पाटलांनी या साऱ्या म्हणी लागू पडतील असे उदाहरण देऊन पीएम चीच नव्हे तर त्यांच्या पक्षाचीही गोची केलीय ..
स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी घराणेशाहीवर सडकून टीका केली. तसेच घराणेशाहीचं राजकारण संपवण्याच्या लढ्यात आपल्याला साथ द्या, असं आवाहनही जनतेला केलं. मोदींच्या या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी फडणवीस कुटुंबाचा राजकीय प्रवासाचा दाखला दिला आहे.
घराणेशाही संपवणार आहात नरेंद्र मोदी साहेब. मग हे पाहा…गंगाधरराव फडणवीस (आमदार), शोभाताई फडणवीस (माजी मंत्री), देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) याचं काय? वाट पाहुयात आता… मोदी साहेबांना त्यांच्या पक्षातून आणि महाराष्ट्रातून सुरुवात कधी करताहेत याची, अशा आशयाचं ट्विट रुपाली पाटील यांनी केलं आहे. पतंप्रधानांच्या आवाहनाला मान देत फडणवीस राजीनामा देतील का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं की, भारतापुढील सर्वात मोठी दोन आव्हाने भ्रष्टाचार आणि घराणेशाही आहेत. भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे आणि घराणेशाही राजकारणातूनही संधी हिसकावून घेत आहे. घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात आपल्याला साथ देण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.मात्र यावर अनेक स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत . राजघराण्यातील वारस निष्कामी निघाले तर जनतेने अशांना उखडून फेकून दिल्याची उदाहरणे दिली जातात .

