पुणे :
पुणे महानगर पालिकेकडून सुरु असलेल्या विश्रामबागवाडा, नानावाडा येथील ऐतिहासिक वारसा सुशोभीकरण कामांची आणि बंडगार्डन आर्ट प्लाझा या पर्यटनविषयक सुशोभीकरण विकासकामाची अनौपचारिक पाहणी शनिवारी करण्यात आली. खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे, पुणे हेरिटेज विभागाचे प्रमुख शाम ढवळे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर उर्फ बंडू केमसे, मनाली भिलारे दौर्यात सहभागी झाले होते.
सकाळी विश्रामबाग वाडा येथून या अनौपचारिक पाहणी दौर्याची सुरुवात झाली. त्यानंतर पुणे हेरिटेज विभागाचे प्रमुख शाम ढवळे यांनी विश्रामबाग वाडा सुशोभिकरणाबाबत अधिक माहिती उपस्थितांना दिली. खा.वंदना चव्हाण यांच्याच प्रयत्नातून पुण्यातील ऐतिहासिक वास्तुंना उजाळा मिळाला आहे.
याप्रसंगी बोलताना खा.वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘पुण्याच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून पुण्याचा ‘लोगो’ व्हावा, अद्ययावत पुणे दर्शन बस, ऐतिहासिक वारसा स्थळांचे सुशोभीकरण आणि बळकटीकरण, बंडगार्डन आर्ट प्लाझा अशा बाबींचा पाठ पुरावा आला. पुणे महानगरपालिका आणि हेरिटेज विभागाच्या सहकार्याने या सर्व ऐतिहासिक स्थळांचे सुशोभिकरण चांगले झाले आहे. पुढील काळात पर्यटकांसाठी रिक्षेची व्यवस्था करण्यात येणार असून रिक्षा चालकांना इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण, पुण्यातील पर्यटन स्थळांची माहितीचे देखिल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुण्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देणार्या ‘पुणे दर्शन रिक्षा’ सुरू करण्यात येणार आहे. विश्रामबागवाडा पोस्ट ऑफिस मध्ये ‘पोस्ट ऑफिस संग्रहालय’ व्हावे यासाठी देखील प्रयत्न करणार आहे.’
विश्रामबाग वाडा, नानावाडा आणि बंडगार्डन आर्ट प्लाझा या वास्तूंच्या सुशोभिकरणाची आणि पुढील नियोजनाची माहिती पुणे हेरिटेज विभागाचे प्रमुख शाम ढवळे यांनी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘पुण्यातील नागरिक व पर्यटकांसाठी पुढील काळात या सुशोभित ऐतिहासिक वास्तू खुल्या होणार आहेत. ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. विश्रामबाग वाडा येथे प्रशिक्षित ‘गाईड’ पर्यटकांना माहिती देतील.’


