पुणे- कोणतेही २ प्रादेशिक पक्ष एकत्र येणे मोठे कठीण काम असते ,पहा नक्की काही तरी खोडा होणार आणि भाजपचेच सरकार स्थापन होवून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असा दावा आज खासदार संजय काकडे यांनी महापालिकेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केला आहे.
आज खा. काकडे हे महापौर आणि उपमहापौर पदाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना आणि त्यांचे उमेदवारी अर्ज भरताना प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या समवेत भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ याही होत्या. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयात या उमेदवारी बाबतची अंतिम बैठक झाली आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले . त्यानंतर खा. काकडे,आ. मिसाळ आणि महापौर पदाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला …
याप्रसंगी खासदार संजय काकडे, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे , सरस्वती शेंडगे हे यावेळी उपस्थित होते. मिसाळ म्हणाल्या, मोहोळ हे अनुभवी नगरसेवक असून पक्षाने महापौर पदासाठी मोहोळ यांचे तर उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांचे नाव निश्चित केले आहे.
रिपाइं चे पाच नगरसेवक असून त्यांना अडीच वर्षात प्रत्येकाला पद दिले आहे. भाजप नगरसेवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अधिकाअधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न आहेत. उपमहापौर पदी संधी न मिळाल्याने रिपाइं चे नगरसेवक नाराज झाले होते. परंतु दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असून त्यानुसार येत्या काळात रिपाइं ला विविध समित्यांमध्ये पदे देण्यात येतील.
संजय काकडे म्हणाले, मोहोळ हे कार्यक्षम नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ते कोथरूड मतदार संघातून इच्छुक होते. परंतु पक्षाने पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मोहोळ यांनी पहिल्याच दिवशी नाराजी दूर ठेवत पक्ष आदेशानुसार पक्षाचा प्रचार ही सुरू केला. यामुळे पक्षाने मोहोळ यांना संधी दिली. मोहोळ हे संपूर्ण शहरभरात काम करतील असा मला विश्वास आहे.
मोहोळ म्हणाले, की या पदासाठी अनेक नगरसेवक इछुक होते. सर्वजण या पदासाठी सक्षम होते. एकच पद असल्याने कोणाची तरी एकाची वर्णी लागणार होती. पक्षाने माझी निवड करून जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्न करेन.
पहा यावेळी नेमके कोण काय म्हणाले ….