पुणे :आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही उमटले. खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु असताना मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन ही स्टंटबाजी असल्याचे वक्तव्य आमदार मेधा कुलकर्णी यांनी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यावर खासदार संजय काकडे यांनी जर, आमदार मेधा कुलकर्णी असे बोलल्या असतील तर, त्यांच्या वतीने व भाजपच्या वतीने मी मराठा समाजाची माफी मागतो असे जाहीरपणे सांगितले. त्यावर मेधा कुलकर्णी यांनीच माफी मागितली पाहिजे. आपण माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी शेवटपर्यंत आपल्यासोबत – खासदार संजय काकडे
आत्महत्या व अनुचित प्रकार न करण्याचे खासदार काकडेंचे भावनिक आवाहन
मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांची संख्या मोठी आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. आरक्षण मिळावे हीच माझी स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजाबरोबरच धनगर, मातंग समाजाचीही आरक्षणासंदर्भात मागणी आहे. सर्व समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशी माझी भूमिका आहे. या सर्व प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पाठपुरावा केला असून यासाठीच्या लढ्यात मी शेवटपर्यंत आपल्याबरोबर असल्याचा विश्वास राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांना दिला. तसेच, आरक्षणासाठी मराठा बंधु-भगिनींपैकी कोणीही अनुचित प्रकार आणि आत्महत्या करू नये, असे भावनिक आवाहनही खासदार काकडे यांनी यावेळी केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी खासदार संजय काकडे यांच्या शिरोळे रस्त्यावरील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. घंटानाद व घोषणा सुरु असतानाच खासदार काकडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत ते आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले.
मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांचे प्रमाण मोठे आहे. या कुटुंबातील लोकांसमोर रोजगार, शिक्षण असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हिंसा, जाळपोळ, आत्महत्यासारखे प्रकार मराठा समाजातील बंधु-भगिनींनी करू नयेत. शांततेत व अहिंसेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे. या लढाईत मी आपणासोबत शेवटपर्यंत असेन, असेही खासदार काकडे यांनी यावेळी सांगितले.